
गिरीश चित्रे / मुंबई
राज्यात १६,५१९ ब्रिटिशकालीन पूल असून त्यापैकी ४५१ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे, तर गेल्या १० वर्षांत १,६९३ पुलांची दुरुस्ती करण्यात आली असून राज्यातील ७० ते ८० वर्षं जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी, व्हीजेटीआय, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते, सल्लागार कंपनी आदींकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे नियोजन असल्याचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात यंदा वरुणराजाचे वेळेआधीच आगमन झाले असून राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे नद्या ओसंडून वाहत असून राज्यात पडझडीचे सत्र सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर राज्यातील धोकादायक पुलांचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने नियमावली तयार केली असून यात कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अधीक्षक अभियंता आदींवर पुलांच्या देखभालीसह विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पावसाळ्यात रस्ते व पूल सुस्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यापक उपाययोजना राबविल्या असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांचे व पुलांचे दुरुस्ती व देखभाल काम वेगाने सुरू आहे.
पाण्याखाली जाणाऱ्या पुलावर फलक लावा
अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून सावधानतेचे फलक लावण्यात येत असून, दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीचे पर्यायी मार्ग योग्य स्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धोकादायक पुलांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड
धोकादायक स्थितीतील, वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचे फलक व बॅरिकेड लावण्यात आले आहेत अशा रस्ते व पुलांची स्थिती शासनस्तरावरून सातत्याने तपासली जात आहे.