घोषणांचा ‘पाऊस’! महायुतीच्या शेवटच्या अर्थसंकल्पात ‘जो जे वांछिल तो ते लाहो’

लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका, येत्या काही महिन्यांतच होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्यातील जनतेवर घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला.
घोषणांचा ‘पाऊस’! महायुतीच्या शेवटच्या अर्थसंकल्पात ‘जो जे वांछिल तो ते लाहो’

मुंबई : लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका, येत्या काही महिन्यांतच होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्यातील जनतेवर घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिला, शेतकरी, तरुण, सामाजिक दुर्बल घटक या सगळ्यांवर सवलतींचा वर्षाव केला.

अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहिना दीड हजार रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे जाहीर करत त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सततच्या इंधन दरवाढीने हवालदिल झालेल्या जनतेला इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत दिलासा दिला आहे, तर गृहिणीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घरगुती गॅसबाबत ‘अन्नपूर्णा योजना’ घोषित करत गरीब कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. वारकऱ्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात २० हजार ५१ कोटी रुपये महसुली तूट दाखवण्यात आली आहे. पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संत तुकारामांच्या अभंगाने करत पंढरपूरच्या विठू माऊलीला वंदन केले. हरिनामाचा गजर करत त्यांनी अर्थसंकल्प वाचून दाखवला. विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले... उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर... ऐसा विटेवर, देव कोठे ऐसे संतजन, ऐसे हरिचे दास... ऐसा नामघोष, सांगा कोठे तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें... पंढरी निर्माण, केली देवें...’ या अभंगाने केली.

राज्यात उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर, एआय संशोधनासाठी निधी, तसेच राज्यात विविध जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. म्हसळा येथे युनानी महाविद्यालय, सिंधुदुर्गमध्ये आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रुपयांची मदत करण्यात आली.

गरीब कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत

घरातील प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी अजित पवार यांनी आपल्या भाषणात ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’ घोषित केली. या योजनेतून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येतील. ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना मोफत वीज

लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बळीराजाला खूश करण्यासाठी अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना’ घोषित केली. त्यानुसार राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा केला जाईल. त्यासाठी १४ हजार ७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा पवार यांनी केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारच्या वतीने महिना १ हजार ५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार असून योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

कांदा उत्पादकांसाठी ‘फिरता निधी’

लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या प्रश्नावर महायुतीची कोंडी झाली होती. कांदा निर्यातीवरील बंदीमुळे कांद्याचे दर गडगडल्याने त्याचा राग शेतकऱ्यांनी सत्ताधारी महायुतीवर काढला होता. त्यामुळे नाशिक, धुळे, पुणे, सोलापूर या कांदा पट्ट्यात महायुतीला सपाटून मार खावा लागला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कांद्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा ‘फिरता निधी’ निर्माण करण्याची घोषणा केली. विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा २०० कोटी रुपयांचा ‘फिरता निधी’ निर्माण करण्यात येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल ६५ पैसे, तर डिझेल २ रुपयांनी स्वस्त होणार

राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) समानता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पेट्रोल ६५ पैसे, तर डिझेल २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. त्यामुळे इंधनाच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना तसेच उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर याचा २०० कोटींचा भार पडणार असून येत्या १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. मूल्यवर्धित कर समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे, तो २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे व डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.

तरुणांसाठी विशेष योजना

शैक्षणिक संस्थातून ११ लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास आता रोजगार मिळणार आहे. दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना राबवणार असून त्यांना दरवर्षी १० हजार रुपये देण्यात येतील. त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात येईल. या योजनेद्वारे दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ

आशा वर्कर, कोतवाल, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात भरीव वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात केली आहे.

गाईच्या दुधासाठी ५ रुपयांचे अनुदान

राज्यात गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ३३१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०० रुपये देण्यात येणार आहेत. गाईच्या दुधासाठी ५ रुपयाचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. १ जुलैपासून हे अनुदान दिले जाणार आहे.

सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट

या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षारक्षक व सशस्त्र सीमा दल या दलांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे १२ हजार जवानांना होईल.

आमच्या संकल्पामुळे विरोधक गॅसवर - मुख्यमंत्री

‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने’मुळे महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. महिला, शेतकरी, तरुणांना, दुर्बल घटकांसाठी आम्ही जाहीर केलेल्या संकल्पामुळे विरोधक गॅसवर आले आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. आमचा संकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले, त्यांचे चेहरे उतरले असून, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खोटे नरेटिव्ह सेट केले होते. मात्र, जनता त्यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उगाच वारेमाप, हवेतल्या घोषणा केलेल्या नाहीत!

या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आलेल्या असल्या तरी त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. उगाच वारेमाप आणि हवेतल्या घोषणा करण्याचे आम्ही टाळले असून राज्याची आर्थिक शिस्त अजिबात बिघडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली आहे.

अजितदादांचा दहावा अर्थसंकल्प

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्यात चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजितदादांनी वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून मार्च २०११ मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी शुक्रवारी सादर केलेला हा दहावा अर्थसंकल्प आहे.

महायुतीचा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर - उद्धव ठाकरे

हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर आहे. सर्वच घटकांना सोबत घेऊन जाण्याचे हे खोटे नरेटिव्ह सरकार सेट करीत आहे. काहीतरी धूळफेक करून जनतेला फसवायचे आणि पुन्हा सत्तेत येऊन राज्याला लुटण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हे लबाडा घरचं आवताण असून, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही. हा अर्थसंकल्प नसून जुमलाबाजीचा नवा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in