
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वीज दर कमी, औद्योगिक धोरण आणि रोजगार निर्मितीवर भर दिला. तसेच ० ते १०० यूनिट वीज वापरणाऱ्या १.५ कोटी ग्राहकांना छतावरील सौरउर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी, टेकवडी ही गावे ‘सौरग्राम’ म्हणून घोषित केली असून त्यांच्यासह अन्य ८ गावांचे सौरऊर्जेद्वारे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बैठक घेऊन ऊर्जा निर्मितीचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सर्वच वीज ग्राहकांनी ऑनग्रीड सौरऊर्जा निर्मितीची शासकीय अधिकारी प्रक्रिया पूर्ण केली. घरांच्या छपरांवर सौरऊर्जा निर्मितीचे प्लेट्स बसवून १०० किलोवॅट वीजनिर्मिती करण्यास सुरुवातदेखील केली. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम झाले.