Maharashtra Budget 2026 : राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाचे जाळे; मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतूंना गती

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुलभ तसेच वेगवान करण्यासाठी मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू आणि किनारी रस्त्यांचे मोठे जाळे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केला.
राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाचे जाळे; मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतूंना गती
राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाचे जाळे; मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतूंना गती'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुलभ तसेच वेगवान करण्यासाठी मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू आणि किनारी रस्त्यांचे मोठे जाळे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केला.

राज्यात २०४७ पर्यंत प्रवासी आणि माल वाहतुकीचे सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी १ हजार २०० किमी लांबीचे मेट्रोमार्ग तसेच ६ हजार किमीपेक्षा जास्त लांबीचे द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील प्रमुख शहरांमधील वाहतूककोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार असून आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

अर्थसंकल्पात प्रस्तावित निधी

  • राज्याची वार्षिक योजना.... २ लाख ७५ हजार ६२६ कोटी रुपये

  • अनुसूचित जाती उपयोजना....... २३ हजार १५० कोटी रुपये

  • अनुसूचित जमाती उपयोजना..... २१ हजार ७२३ कोटी रुपये

भुयारी मार्गांचे जाळे विणणार

मुंबई आणि पुण्यातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी लाँचिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोरेगाव-मुलुंड भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ठाणे ते बोरिवली या १८,८३८ कोटी रुपयांच्या भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर असून जून २०२८ पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. खारघर ते तुर्भे या सुमारे ६ किमी लांबीच्या २,१०० कोटी रुपयांच्या भुयारी मार्गाचे कामही सुरू आहे. हा प्रकल्प सप्टेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गायमुख जंक्शन ते फाऊंटन हॉटेल जंक्शनदरम्यान सुमारे ६ किमी लांबीचा भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल ते भाईंदरदरम्यान ९ किमी लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित केला आहे.

मेट्रो प्रकल्पांना गती

मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये एकूण ४९० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी १७३ किलोमीटर लांबीचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. पुढील वर्षात आणखी ५० किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन असून २०२९ पर्यंत आणखी १६५ किलोमीटर मार्ग सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका-११ चा ३२ हजार ४८७ कोटी रुपयांचा पूर्णपणे भुयारी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरी स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग-८ हा २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. तसेच तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग-२ हा ५ हजार ५७५ कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत असून यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.

उन्नत मार्गांचे काम

अटल सेतू ते पश्चिमेकडील कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान मुंबईतील सिग्नलमुक्त वाहतुकीसाठी शिवडी ते वरळी उन्नत मार्गाचे काम प्रगतिपथावर असून ते सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या उन्नत मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणारा १ हजार १०२ कोटी रुपयांचा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरिता छेडानगर ते आनंदनगर आणि आनंदनगर ते साकेत (ठाणे) या उन्नत मार्गांच्या कामाला गती देण्यात आली आहे.

सागरी सेतू आणि किनारी रस्ते

स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू हा सुमारे १८ हजार १२९ कोटी रुपयांचा प्रकल्प असून त्याचे चारही टप्प्यांचे काम सुरू आहे. हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्सोवा-दहिसर-भाईंदर हा सुमारे ६० किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग २२ हजार १६६ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असून डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाशी जोडणी करण्यासाठी उत्तन ते विरार दरम्यान ५८ हजार ७५४ कोटी रुपयांचा सागरी सेतू उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

logo
marathi.freepressjournal.in