मुंबई : राज्यातील १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना क्राँक्रीटच्या रस्त्यांनी जोडले जाईल. त्यासाठी आशियाई बँकेच्या सहाय्याने ४ हजार ५०० कोटी रुपये किंमतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात केली. यावेळी अर्थसंकल्पात विविध रेल्वे, रस्ते योजनांची माहिती देण्यात आली.
पुणे लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिका प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून यासाठी ५ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिका प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड, तळेगाव या औद्योगिक भागाला लाभ होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ मधील खडकवासला, स्वारगेट, हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. पुणे रामवाडी ते वाघोली दरम्यानच्या ११ किमी दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच येरवडा ते कात्रज तसेच हिजेवाडी ते सिंहगड रोड या ५४ किमी.च्या दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे.
शक्तिपीठ महामार्ग
पवनार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग या शक्तिपीठ महामार्गाच्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. याशिवाय कल्याण-लातूरपर्यंत द्रुतगती मार्ग ग्रीनफिल्ड उभारण्याचे प्रस्तवित आहे. पुणे ते शिरूर हे ५३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी ७ हजार ५१४ कोटी मंजूर केले आहेत. तळेगाव चाकण या उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या १९२ किमी. लांबीच्या महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज एमआयडीसी दरम्यान उन्नत मार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
विशेष प्राधिकरणाची स्थापना
छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर पुणे यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना केली आहे. शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, आणि कराड या विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहेत… गडचिरोली ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अमृतकाल रस्ते विकास
अमृतकाल रस्ते विकास योजनेत २०२५ ते २०४७ दरम्यान राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या योजनेत ६ हजार २७२ किमीचे द्रुतगती मार्ग १४ हजार किमीचे राज्य रस्ते आणि ४ हजार किमीचे पर्यटनस्थळ रस्ते यांचा समावेश आहे. ही योजना महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या विकासकामांवर एक नजर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त दादर, येथील राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.
मुंबई महानगर परिसरात वैदिक ज्ञान व संगीत परंपरेवर आधारित वेलनेस उत्कृष्टता केंद्र
कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्यातून ४ हजार ५०० कोटी रुपये किमतीची प्रगती योजना
राज्यात सार्वजनिक आरोय परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबवणार
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा
कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदी स्वच्छता, शाहीस्नान तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपसा सिंचनाव्दारे पाण्याची व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प, घाट सुधारणा
नाशिक विमानतळ रिंग रोड, रेल्वे स्टेशन व बस स्टेशनच्या पायाभूत सुविधांची श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्यात येणार
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली सातारा येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार
थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मगावी (मौजे कटगुण, तालुका खटाव जिल्हा सातारा) येथे भव्यस्मारक प्रस्तावित
संत गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंतीवर्षानिमित्त ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाब ग्राम समृद्धी अभियान राबवण्यात येणार
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयीसुविधांसाठी विकास आराखडा तयार करणार
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५-२०४७ अंतर्गत ६ हजार २७२ किमीचे द्रुतगती मार्ग, १४ हजार ९१९ किमीचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच ४ हजार २४७ किमीचे पर्यटन पथ
शक्तिपीठ महामार्गावरील कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता
कल्याण जिल्हा ठाणे ते लातूरपर्यंत ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गासाठी संरेखनाची कार्यवाही सुरू
आशियाई बँकेच्या सहाय्याने राज्यातील एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या अससलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याची घोषणा
छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज एमआयडीसीदरम्यान उन्नत मार्गाचे काम दोन टप्प्यांमध्ये करणार
वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गाने जोडण्यासाठी तवा ते भरवीर माल मालवाहतूक काॅरीडॉरच्या कामास मान्यता
लातूर, बारामती व अमरावती विमातळावर रात्रीच्या उड्डाणांची सुविधा करणार
गडचिरोली ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू