विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय; उपमुख्यमंत्री म्हणाले, "जबाबदारी आम्ही घेऊ"

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय निघाला आणि सभागृहात हशा पिकला
विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय; उपमुख्यमंत्री म्हणाले, "जबाबदारी आम्ही घेऊ"
Published on

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चक्क ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय निघाला. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंची फिरकी घेतली. तर, आदित्य ठाकरेंनीही यावर आपली प्रतिक्रिया देत भाजपला टोला लगावला. मात्र, या चर्चेमुळे सभागृहात सर्व आमदारांना हसू आवरले नाही.

आमदार बच्चू कडू भाषणादरम्यान म्हणाले की, "कामगार आहे म्हणून लग्न केले, पण आता लग्न तुटले तर यासाठी जबाबदार कोण? सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी. याच्यासाठी काही धोरणे आखण्यात येणार आहेत का? हा मत्त्वाचा प्रश्न आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लग्न जोडण्याची जबाबदारी राज्य सरकारची, तुटल्यानंतर त्याला सांभाळण्याची जबाबदारीही सरकारची. पण बच्चू कडूंनी जी सूचना केली, ती नक्की तपासून पाहू आणि यावर काही धोरण तयार करता येईल का याचाही विचार करू" यानंतर मात्र, फडणवीसांनी पुढे म्हणाले की, "हा प्रश्न बच्चू कडूंनी आदित्य ठाकरेंकडे बघून विचारला होता का? सरकारने लग्न लावायचे? " असा प्रश्न विचारताच हशा पिकाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फिरकीवर आदित्य ठाकरेंनी जागेवरूनच हसत नकार दिला त्यावेळी फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, "सरकार याची जबाबदारी घ्यायला तयार आहे." यावर उत्तर देताना मग आदित्य ठाकरे म्हणाले की, "ही राजकीय धमकी समजायची का? की तुम्ही आमच्यासोबत बसा अन्यथा तुमचे लग्न लावून देऊ," अशी प्रतिक्रिया देताच सभागृहात उपस्थित आमदारांना हसू आवरले नाही.

logo
marathi.freepressjournal.in