आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी!

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली.
आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी!
आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील (डावीकडून)
Published on

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तुम्हाला खाते कळाले की नाही, असा शब्दांत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांना ललकारले. त्यावर ‘मला हे खाते तुमच्या बापानेच दिले होते,’ असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. त्यानंतर ठाकरे यांनी ‘म्हणूनच तुम्ही पळून गेला होता,’ असा खोचक टोला लगावल्याने सभागृहातील वातावरण तापले होते.

आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी गुलाबराव पाटील यांना धारेवर धरले. “राज्याच्या मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर तो प्रश्न राखून ठेवावा. मंत्र्याला सांगा, अभ्यास करून उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचे खाते कळाले की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचे शब्द जिव्हारी लागल्यानंतर गुलाबराव यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. “अहो यांच्या बापाला कळले होते, म्हणून त्यांनी मला खाते दिले होते,” असे पाटील म्हणाले. मात्र, वडिलांऐवजी ‘बाप’ असा शब्द वापरल्याची चूक लक्षात येताच त्यांनी वडील शब्द वापरून सारवासारव केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत दोघांना वैयक्तिक टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला. तसेच, ‘मी हे रेकॉर्डवर घेणार नाही,’ असे स्पष्ट केले. मात्र, हा सामना सभागृहातील सर्व सदस्यांच्या चर्चेचा विषय ठरला.

आदित्यनी घेतली फडणवीसांची भेट

अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच, आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दोघांमध्ये झालेली ही चौथी भेट आहे. यावेळी आदित्य यांच्यासोबत आमदार वरुण सरदेसाई आणि सचिन अहिर उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव फायनल केले आहे, त्याच अनुषंगाने ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in