

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी माणशी पाच किलो धान्य देण्यात येणार आहे.
राज्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रूपये दिले जातात. दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांनाही दर महिन्याला प्रतिमाणशी पाच किलो मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
लाभार्थी नेमके कोण?
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ तसेच एपीएल-डिबीटी योजनेचा रोख लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तीन महिन्यांसाठी.
आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वाटप.
उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे धान्य देणार.
मोफत धान्य वितरणासाठी अतिरिक्त नियतन केंद्राच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मागणी करण्यास मान्यता.