

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील चांदवडसह सिल्लोड, किनवट, केज अशा चार शहरात न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन होणार आहे.
यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकारी आणि सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांमधून चांदवड न्यायालयासाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदासह २१ नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शिपाई, पहारेकरी आणि सफाईगार या पदांसाठी चार मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकारी आणि सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांमधून या न्यायालयासाठी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या एक पदासह न्यायालयासाठी २० नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.