वादग्रस्त मंत्र्यांना तूर्तास अभय; यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही - मुख्यमंत्र्यांची तंबी, दिलगिरी व्यक्त करताच कृषीमंत्री कोकाटेंना दिलासा

गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त प्रकरणांमुळे कोंडीत सापडलेल्या महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांची मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळा घेतली.
वादग्रस्त मंत्र्यांना तूर्तास अभय; यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही - मुख्यमंत्र्यांची तंबी, दिलगिरी व्यक्त करताच कृषीमंत्री कोकाटेंना दिलासा
Published on

मुंबई : संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण असो, संजय शिरसाट यांचा पैशाने भरलेल्या बॅगेचा व्हायरल झालेला व्हिडीओ असो किंवा ‘सावली बार’वरून अडचणीत आलेले गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शेतकऱ्यांप्रति बेताल वक्तव्ये आणि सभागृहात रमी खेळतानाचा व्हायरल झालेला माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ... अशा एकापेक्षा एक वादग्रस्त प्रकरणांमुळे कोंडीत सापडलेल्या महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तूर्तास अभय दिले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व मंत्र्यांची शाळा घेतली आणि यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, अशी तंबी देत वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेणे टाळले.

महायुतीची मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाल्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह संजय गायकवाड आणि योगेश कदम यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार होती. अखेर मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मंत्रालयात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदी कायम ठेवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

फक्त इशारे, कारवाई शून्य

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मंत्र्यांवर कारवाई करायची असल्यास भाजपच्या मंत्र्यांनाही समान न्याय द्यावा, अशी मागणी महायुतीतील अन्य दोन पक्षांनी केल्यामुळे तूर्तास ही राजीनाम्याची कारवाई बारगळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या कात्रीला मुख्यमंत्र्यांनीच फुलस्टॉप लावल्याने आता ‘शाब्दिक बुडबुडे आणि कारवाई शून्य’ अशी टीका विरोधकांकडून महायुतीवर होऊ लागली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन योगेश कदम यांच्याविरोधातील सर्व पुरावे त्यांना सादर केले आणि कारवाईची मागणीसुद्धा केली.

वादग्रस्त विधाने, पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी लावून धरली होती. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्री कोकाटे यांची विकेट जाणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, मंगळवारी कोकाटे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मंगळवारी सकाळी कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

कोकाटे मंत्रालयात अजित पवार यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतर माणिकराव कोकाटे प्रसारमाध्यमांशी काही न बोलता, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा निश्चित, अशी चर्चा मंत्रालयात रंगली होती. मात्र, कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांचा राजीनामा न घेता, अजित पवार यांनी कोकाटे यांना फक्त समज दिल्याचे समजते.

मंत्र्यांना गोमूत्र शिंपडून पवित्र करून घ्या - वडेट्टीवार

राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधाने करतात, विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना रमीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही. कृषीमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, असा घणाघात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्याचे गृह राज्यमंत्री डान्सबार चालवतात, एका मंत्र्यांकडे पैशांच्या बॅगा सापडतात पण तरीही त्यांची पाठराखण करण्यात येत असेल तर या सर्व मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्र्यांची शाळा

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जवळपास २० मिनिटे मंत्र्यांची ‘शाळा’ घेतली. “वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती यापुढे अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती केली जाईलच. आता एकही प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना सज्जड दम दिला.

logo
marathi.freepressjournal.in