
मुंबई : आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा केवळ राज्यातील परीक्षा केंद्रांवरच घेणात येणार असल्याचे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा देण्याकरिता राज्यातील केंद्रांवर यावे लागणार आहे.
पारदर्शकता राखण्यासाठी आणि सीईटीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पुढील वर्षापासून परीक्षा केंद्र महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
बिहारमधील पटणा येथील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी झालेल्या सीईटीमध्ये शंभर टक्के गुण मिळवले होते. या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. या प्रकाराचा उल्लेख करून मंत्री पाटील म्हणाले की, अशा घटनांमुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होतो आणि ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडते. मात्र सीईटी महाराष्ट्रात घेतल्यास असे गैरप्रकार रोखता येतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.