उच्च शिक्षण विभागाच्या CET परीक्षांच्या तारखा निश्चित; लवकरच लॉगिनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या सीईटी कक्षाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सात अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या अंतिम तारखा सीईटी कक्षाने जाहीर केल्या आहेत.
उच्च शिक्षण विभागाच्या CET परीक्षांच्या तारखा निश्चित; लवकरच लॉगिनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार
Published on

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या सीईटी कक्षाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सात अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या अंतिम तारखा सीईटी कक्षाने जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचे हॉलतिकीट लवकरच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उच्च शिक्षण विभागाच्या एलएलबी (३ वर्षीय व ५ वर्षीय), बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (ईएलसीटी), बीपीएड, एमएड, एमपीएड व बीएड+एमएड या या सात अभ्यासक्रमापैकी सहा सीईटी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे. तर एलएलबी (५ वर्षीय) या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ मार्च पर्यंत मुदत आहे. सीईटी सेलने यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. आता या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार २०२६ ची पहिली सीईटी परीक्षा २४ मार्च पासून सुरू होत आहे. एमपीएड या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेपासून यावर्षीच्या सीईटी परीक्षेस प्रारंभ होत आहे, तर १७ मे पर्यंत एकूण १७ सीईटी परीक्षा होणार आहेत. मार्च ते मे अशा तीन महिन्यात ४५ दिवसांत या प्रवेश परीक्षा होणार आहेत. या परीक्षांसाठी आजपर्यंत १२ लाख ९४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून दोन्ही संधी मिळून १७ लाख ४२ हजार ०६० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

सीईटीतील उच्च शिक्षण विभागाच्या या सात प्रवेश परीक्षेची हॉल तिकिटे संबंधित प्रवेश परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध होतील.

प्रवेश परीक्षेच्या तारखा

  • एमपीएड : २४ मार्च रोजी परीक्षा होणार असून २ हजार ५२५ विद्यार्थी देणार परीक्षा

  • एमपीएड (फिल्ड टेस्ट ऑफलाइन) परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे.

  • एमएड : २५ मार्च रोजी ३ हजार ९८५ विद्यार्थी परीक्षा देणार

  • बीएड (जनरल व स्पेशल ) व बीएड (इएलसीटी) २७ मार्च ते २९ मार्च : १,१०,०४१ विद्यार्थी परीक्षा देणार

  • एलएलबी (३ वर्षीय) परीक्षा १ ते २ एप्रिल रोजी होणार असून ८३ हजार ४८५ विद्यार्थी परीक्षा देणार.

  • बीपीएड परीक्षा ४ एप्रिल रोजी होणार असून ही परीक्षा ६ हजार ५४ विद्यार्थी देणार आहेत.

  • बीपीएड (फिल्ड टेस्ट ऑफलाइन ) ५ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी होईल.

  • बीएड+एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) परीक्षा ९ एप्रिल रोजी होणार असून १ हजार २४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

  • एलएलबी ५ वर्षीय परीक्षा ८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यात येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in