

मुंबई : सीईटी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदापासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये डिजिटल, सायबर व एआयच्या साह्याने केलेल्या गैरप्रकारासही अटकाव करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेदरम्यान बोलणे, संकेत देणे, हावभावांची देवाणघेवाण करणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करणे असे घडल्यास संबंधिताची सीईटी उमेदवारी रद्द केली जाणार आहे.
सीईटी कक्षामार्फत १७ अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. यातील १५ प्रवेश परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेतल्या जातात. या परीक्षेमध्ये उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संस्थांकडून कोणताही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांचा वापर केल्यास त्यासाठी विविध शिक्षा व दंड करण्यात येतो. या गैरप्रकारास अटकाव करण्यासाठी व काही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांचा वापर झाल्यास त्यांच्या गैरव्यवहाराचे स्वरूप पाहून त्यांना उचित शिक्षा व दंड करण्याची तरतूद असलेली सुधारित नियमावली सीईटी कक्षाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. परीक्षेमध्ये उमेदवार गैरव्यवहारामध्ये व अनुचित मार्गांचा वापर करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे स्मार्टफोन, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, ब्लूटूथ डिव्हाइस, इअरफोन किंवा तत्सम गॅजेट्स बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एआय टूल्स, लपलेले कॅमेरे, स्क्रीन मिररिंग, रिमोट-ॲक्सेस सॉफ्टवेअर किंवा डिजिटल साधनाचा वापर करणे प्रतिबंधित केले आहे.
परीक्षा केंद्रांनाही कडक नियम
परीक्षा केंद्रांसाठी कडक नियम तयार केले आहेत. परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही लावणे, बायोमेट्रिक पडताळणी करणे व कडक देखरेख करणे महत्वाचे आहे. यामध्ये एखाद्या केंद्राने निष्काळजीपणा केल्यास सीईटी कक्ष अशा परीक्षा केंद्राची मान्यता तात्पुरती किंवा कायमची रद्द करणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासोबत आर्थिक किंवा प्रशासकीय दंड करणार आहे.