
मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांचे मंत्रिपद कापले होते. यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. पण आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भुजबळांना मंत्रिपद देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुतीने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
छगन भुजबळ यांनी मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यानंतर भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद रिक्त झाले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुती आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिपद देऊन खेळी खेळल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व याआधी मंत्रिमंडळात होते. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात आला आहे.
नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची चांगलीच पकड असून ओबीसी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर भुजबळ हे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांनी आधीच नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यात भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यानंतर भुजबळ नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री कोण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळांची हजेरी
अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी मंगळवारी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली.