मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची पुन्हा दिल्लीवारी; नाराजी दूर होणार?

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, आतापर्यंत भाजप पक्षश्रेष्ठींनी जे सूत्र ठरविले आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मान्य नाही. त्यामुळे...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांची पुन्हा दिल्लीवारी; नाराजी दूर होणार?
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, आतापर्यंत भाजप पक्षश्रेष्ठींनी जे सूत्र ठरविले आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मान्य नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी नाराजी बोलून दाखविली असून, अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भाजप नेत्यांवर दबाव वाढविला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत तेथे जागावाटपावर चर्चा होऊ शकते.

राज्यात भाजपने अगोदरच ३३ ते ३५ जागा लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला १० ते १२ आणि अजित पवार गटाला केवळ ३ ते ४ जागा देण्याचे सूत्र ठरविले आहे. परंतु दोन्हीही गट या जागावाटपावर नाखुश आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेसाठी दिल्लीत बोलावण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेते रात्री राजधानी दिल्लीत दाखल झाले. ते भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा करू शकतात. यासंबंधीची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

तथापि, या बैठकीत शिंदे गट आणि अजित पवार गट अपेक्षेप्रमाणे जागा मिळवणार का, हा खरा प्रश्न आहे. मुळात भाजप दोन्ही गटांना एकही जागा वाढवून द्यायला तयार नाही. कारण भाजपने केलेल्या सर्वेक्षणात शिंदे गटाच्या बऱ्याच विद्यमान खासदारांच्या जागा धोक्यात आहेत. त्यामुळे त्या जागांची अदलाबादल करून भाजपचा उमेदवार किंवा भाजपच्याच नेत्याला शिंदे किंवा अजित पवार गटात उमेदवारी द्यायला लावून लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही मित्रपक्ष हे सूत्र मान्य करणार का? की आपलेच उमेदवार मैदानात उतरविण्याविषयी ठाम राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाचे खासदार नाराज?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर १८ पैकी तब्बल १३ खासदार शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे शिंदे गटाला किमान १३ जागा मिळणे अपेक्षित आहे. परंतु, भाजप त्यांना १० ते १२ जागा देण्यास इच्छुक आहे. त्यातही बऱ्याच ठिकाणी विद्यमान खासदाराला उमेदवारी न देता नवा चेहरा देण्यासाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली असून, अनेकांनी नाराजीही बोलून दाखविली आहे. त्यातही काही जणांना डच्चू मिळाल्यानंतर ते काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in