
मुंबई : कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली आहे.
मार्च २०२३ मध्ये अति तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८० हजार २४८ होती. परंतु कुपोषित बालकांच्या संख्येत घट होत असून मार्च २०२५ मध्ये कमी वजन व उंचीची २९ हजार १०७ कुपोषित बालके आढळली आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात अति तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण १.९३ वरून ०.६१ टक्क्यांवर आले आहे. तर मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण ५.९ वरून ३.११ टक्क्यांवर आले असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात अति तीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात यश आले आहे.
कुपोषणमुक्तीच्या दिशेने सुरू असलेली ही वाटचाल, राज्याच्या विविध विभाग, यंत्रणांचे एकत्रित प्रयत्न, समन्वय आणि संवादाची फलश्रृती असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांनी या यंत्रणातील विविध अधिकारी, घटकांचे, क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या सर्वांचेच कौतुक केले. महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही राज्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबरीने मानव विकास आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असणे, हे गौरवास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अशी होती कुपोषित बालकांची संख्या
मार्च २०२३ - ४१ लाख, ६७ हजार १८०
मार्च २०२४ - ४२ लाख ६२ हजार ६५२
मार्च २०२५ - ४८ लाख १० हजार ३०२
अशी घटली कुपोषित बालकांची संख्या
मार्च २०२३ अखेर - ८०,२४८ (१.९३ टक्के )
मार्च २०२४ अखेर - ५१,४७५ (१.२१ टक्के)
मार्च २०२५ अखेर - २९,१०७ (०.६१)