अखेर निवडणुकांचे बिगुल वाजले; २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान; ३ डिसेंबरला मतमोजणी
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदांसाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे घोषित सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
सचिवालय जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वाघमारे यांनी सांगितले की, “राज्यातील एकूण २४७ पैकी २४६ नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १० नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. उर्वरित सर्व २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण १४७ पैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १५ नवनिर्मित तर उर्वरित सर्व २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. १०५ नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशीही संवाद साधण्यात आला आहे.” आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते.
उमेदवारांसाठीच्या खर्चमर्यादेत वाढ
या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
मतदान केंद्रांत मोबाईल नेता येणार
दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रॅम्प आणि व्हिलचेअरची व्यवस्था सर्व मतदान केंद्रांवर केली जाणार आहे. यावेळेस, मतदान केंद्रांच्या परिसरात मोबाईल नेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास बंदी असेल. मतदान कक्षाबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. काही मतदान केंद्रांना विशेष ‘गुलाबी मतदान केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गुलाबी केंद्रांवर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस महिला असतील.
एकूण मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार - ५३,७९,९३१
महिला मतदार - ५३,२२,८७०
इतर मतदार - ७७५
एकूण मतदार - १,०७,०३,५७६
एकूण मतदान केंद्र - सुमारे १३,३५५
विरोधकांच्या आक्षेपांना वाटाण्याच्या अक्षता
मतदार यादीतील गोंधळाप्रकरणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. मात्र आयोगाने याबाबत कोणतेही उत्तर दिले नसल्याचे, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या तारखा
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात : १० नोव्हेंबर
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत : १७ नोव्हेंबर
नामनिर्देशनपत्रांची छाननी : १८ नोव्हेंबर
अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत : २१ नोव्हेंबर
अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर
मतदानाचा दिवस : २ डिसेंबर
मतमोजणीचा दिवस : ३ डिसेंबर
दुबार मतदारांची नावे शोधण्यासाठी टूल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराची नावे शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संगणकीय टूल विकसित केले आहे. या टूलच्या माध्यमातून दुबार नावे असलेल्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार (**) चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल.
एकूण जागा आणि आरक्षित जागा
निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा - २४६
निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती - ४२
एकूण प्रभाग - ३,८२०
एकूण जागा - ६,८५९
महिलांसाठी जागा - ३,४९२
अनुसूचित जातींसाठी जागा - ८९५
अनुसूचित जमातींसाठी जागा - ३३८
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा - १,८२१
विरोधकांच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाने भेट नाकारली; मविआ नेत्यांचा कार्यालयात ठिय्या
नवी दिल्ली : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच, राजधानी नवी दिल्लीत मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयोगाने भेटण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने संतप्त झालेल्या मविआच्या नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या दिला. मतदारयाद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह अतुल लोंढे, राजवी झा यांचा समावेश होता.
