फ्रॉड टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा ; फसवणूक होतेय कळताच हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा ; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळाले असले तरी सायबर गुन्हे रोखणे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जसे रस्ता अपघातात ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो, तसेच सायबर फसवणुकीतही आहे. तातडीने तक्रार दिल्यास फसवलेली रक्कम परत मिळवणे सोपे होते. त्यामुळे फसवणूक झाल्यास लगेचच १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
फ्रॉड टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा ; फसवणूक होतेय कळताच हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा ; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
Photo : X (@CMOMaharashtra)
Published on

मुंबई : अनेक प्रकारच्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. मात्र आजच्या घडीला सायबर गुन्हा रोखणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘सायबर जनजागृती’ ऑक्टोबर २०२५ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस मुख्यालय येथे झाले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, व्हीजेटीआयचे डॉ. फारूक काझी, ‘आयआयटी’ मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वात मोठ आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, पेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून घोटाळे, खंडणी, सायबर बुलिंग यासारखे प्रकार घडतात, असेही ते म्हणाले.

यावेळी सायबर सुरक्षाविषयक माहितीपट दाखविण्यात आला. तसेच ‘सायबर योद्धा’ या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सायबर जनजागृतीसाठी काम करणाऱ्या सायबर वॉरियरचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी आभार मानले.

तंत्रज्ञानच उपाय !

आधुनिक तंत्रज्ञानाचा धोका असून त्यावर तंत्रज्ञान हाच उपाय आहे. डीपफेकसारख्या आव्हानांवर आपली क्षमता वाढविणे गरजेचे आहे. कोणताही डिजिटल गुन्हा त्याचा डिजिटल फिंगरप्रिंट मागे ठेवतो. त्यामुळे क्षमता आणि जनजागृती दोन्ही समान महत्त्वाचे आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in