

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत.
आतापर्यंत पाच विद्यापीठांना 'लेटर ऑफ इन्टेंट' देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी'मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
द्विपक्षीय संबंधांना इतिहास - शॅम्पेन
कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले.