मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक

मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन तसेच संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक
मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक(Photo-X/@MahaDGIPR)
Published on

मुंबई : मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन तसेच संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. याशिवाय राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी, यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी “संस्थेचा गेल्या काही वर्षांचा प्रशासकीय आणि वैधानिक अनुशेष पूर्ण झाल्याने संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम झाली आहे. त्यामुळे आता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देणे आवश्यक आहे,” असे सांगितले. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘पेटी वाचनालय’ उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी आणि सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविणे, झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्य संकुल उभारणे, भारूड, गोंधळ, पोवाडा यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून मराठीचा वारसा जपणे तसेच बालसाहित्य आणि बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा फडणवीस यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

या बैठकीला मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, भाषा संचालक अरुण गीते तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे अशासकीय सदस्य प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

‘अनुवाद समिती’ स्थापन करण्याचा निर्णय

मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ‘अनुवाद समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in