मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राम मंदिरासाठी 11 कोटींची देणगी; उदय सामंत यांनी मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केला धनादेश

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र सरचिटणीस चंपत राय यांनी या देणगीबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राम मंदिरासाठी 11 कोटींची देणगी; उदय सामंत यांनी मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केला धनादेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरासाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. "महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेनेच्या वतीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम मंदिरासाठी 11 कोटी रुपये दिले आहेत. आज आम्ही 11 कोटी रुपयांचा धनादेश राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यासाठी याठिकाणी आलो आहोत", असे सामंत म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र सरचिटणीस चंपत राय यांनी या देणगीबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. "महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने 11 कोटी रुपयांचा धनादेश देण्यासाठी येथे आले ही आनंदाची बाब आहे. ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे", असे राय म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार-

"भगवान राम सर्वांचे कल्याण करतील. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे लोकार्पण होत आहे, आपल्या देशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पंतप्रधान मोदींचे आभार मानले पाहिजेत, ज्यांनी हे स्वप्न साकार करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी करोडो भारतीयांचे स्वप्न, आमच्या बाळासाहेबांचे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले", असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in