जादा शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर अंकुश; CET सेलची सुविधा सुरू

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून निश्चित केलेल्या शुल्काहून अधिकचे शुल्क घेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा महाविद्यालयांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून निश्चित केलेल्या शुल्काहून अधिकचे शुल्क घेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा महाविद्यालयांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकडून 'डेव्हलपमेंट फंड', 'कॅम्पस मेंटेनन्स फी', 'लॅब अपग्रेडेशन फी' अशा नावाखाली अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारून परतावा न देणे, प्रवेश रोखणे, कागदपत्रे न देणे यासारखे प्रकारही महाविद्यालयांकडून सुरू आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी सीईटी सेलने ७७००९१९८९४ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते संध्याकाळी ६, सुट्टीचे दिवस वगळून) तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच https://portal.maharashtracet.org या संकेतस्थळावर लॉगइन करून 'Open a New Ticket' पर्यायातून "CAP Enquiry College Fee Complaint" श्रेणी निवडून तक्रार नोंदवता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तक्रारीसाठी आवश्यक कागदपत्रे

या तक्रारीसोबत विद्यार्थ्यांना शुल्क पावत्या, नोटिसा, पत्रव्यवहार यासारखे पुरावे अपलोड करावे लागणार आहेत. तसेच तक्रारीत विद्यार्थ्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव व जादा शुल्काचा तपशील स्पष्ट नमूद करावा लागेल. यावर सीईटी सेल संबंधित महाविद्यालय व शुल्क नियमन प्राधिकरणाकडून तपासणी करून दोषी आढळल्यास दंड, मान्यता रद्द करणे किंवा पुढील प्रवेश प्रक्रिया थांबवणे यांसारखी कारवाई करणार आहे.

'शुल्क नियमन प्राधिकरणा'च्या नियमांना केराची टोपली

व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, विधी अशा विविध अभ्यासक्रमांचे शुल्क 'शुल्क नियमन प्राधिकरणा' मार्फत ठरविण्यात येते. निश्चित करण्यात आलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेण्यास महाविद्यालयांना मनाई आहे. यानंतरही महाविद्यालये मंजूर शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून येऊ लागल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in