झिशान सिद्धीकी, जितेश अंतापूरकर यांची 
काँग्रेसमधून हकालपट्टी
Photo: X

झिशान सिद्धीकी, जितेश अंतापूरकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांचे झिशान सिद्धीकी हे पुत्र आहेत, तर अंतापूरकर हे देगलूर-मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या दोन्ही आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहेत.
Published on

मुंबई : काँग्रेसचे आमदार झिशान सिद्धीकी, जितेश अंतापूरकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांचे झिशान सिद्धीकी हे पुत्र आहेत, तर अंतापूरकर हे देगलूर-मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या दोन्ही आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहेत.

झिशान हे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबा सिद्धीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला. वांद्रे मतदारसंघात अजित पवार यांची जनसन्मान यात्रा यशस्वी करण्यात झिशान यांचा मोठा वाटा होता, तर जितेश अंतापूरकर हे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. सिद्धीकी व अंतापूरकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांना काँग्रेसमधून काढून टाकले आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीत महायुतीला मतदान करणाऱ्या आमदारांमध्ये दोन्ही आमदारांचा समावेश असल्याचा संशय आहे. मात्र हे दोन्ही आमदार पक्षविरोधी कामे करत असल्याने त्यांची हकालपट्टी केली, असे सूत्रांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांविरोधात अजूनही काँग्रेसने कारवाई केलेली नाही. मात्र, या आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे.

अंतापूरकर भाजपमध्ये

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आमदार जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व खासदार अशोक चव्हाण हे उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in