राज्यात दररोज सरासरी १०५ महिला - मुली बेपत्ता; प्रत्येक पोलीस ठाण्यात 'मिसिंग सेल'; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

राज्यात महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्यात दररोज सरासरी १०५ महिला - मुली बेपत्ता; प्रत्येक पोलीस ठाण्यात 'मिसिंग सेल'; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यात महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण ३८ हजार ३९७ महिला व मुली बेपत्ता झाल्या असून सरासरी दररोज १०५ महिला व मुली बेपत्ता होत आहेत. त्याचप्रमाणे २०२१ ते २०२५ या चार वर्षांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडी प्रकरणी १६ हजार १६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेपत्ता महिला, मुली या ह्यूमन ट्रॅफिकिंगमध्ये जात असून हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात 'मिसिंग सेल' स्थापन करण्यात येत असून, त्याचे नेतृत्व एपीआय दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडे दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात एका महिन्यात हरवलेल्या ४९६० महिला व १३६४ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच रेकॉर्डवर नसलेल्या १०६ महिला व ७०३ बालकांचा शोध घेण्यात आला. तसेच 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत १३ ऑपरेशन राबविण्यात आली असून, आतापर्यंत ४१,१९३ मुलांचा शोध लावला. याची दखल कोर्टाने देखील घेतली. नागपूर शहरातच गेल्या १७ महिन्यांत ५,८९७ जण बेपत्ता झाले असून, यापैकी ५२१० जणांचा शोध लावण्यात आला. हे प्रमाण ९० टक्के आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यासाठी एक पोर्टल

गेल्या तीन वर्षांत सातारा जिल्ह्यात ५,३१६ महिला, मुले आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी १,०९६ अजूनही सापडलेल्या नाहीत असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. सगळ्या राज्यासाठी एक पोर्टल तयार केले असून त्यामध्ये राज्याची माहिती भरली जाईल असेही त्यांनी सांगितले. अंबादास दानवे यांनी सरकारकडून अनेक मोहिमा राबवल्या जात असल्या तरी सुद्धा समाजशास्त्रीय अभ्यास उपायोजना केल्या पाहिजेत अशी सूचना केली.

logo
marathi.freepressjournal.in