

मुंबई : महाराष्ट्रातील धरणांमध्ये सध्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाने मंगळवारी दिली.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, १३ जुलैपर्यंत राज्यातील ३,०२९ धरणांमध्ये एकूण ६३२.८९ टीएमसी (अब्ज घन फूट) पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा ८४३.५७ टीएमसी (५९ टक्के) इतका होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा बराच कमी आहे. मात्र, २० जून रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) सक्रिय झाल्यानंतर धरणांमधील साठ्यात २९५.५१ टीएमसीने वाढ झाली आहे.
विभागनिहाय टक्केवारी
राज्यातील सहा महसूल विभागांचाविचार केल्यास नाशिक विभागात सध्या सर्वाधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभाग: ८६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभाग: ६६ टक्के, कोकण विभाग: ६२ टक्के, पुणे विभाग: ५१ टक्के, अमरावती विभाग: ४२ टक्के, नागपूर विभाग: ४० टक्के. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ४८ टक्के उपयुक्त (live) पाणीसाठा आहे. तर मध्यम धरणांमध्ये ४२ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये अवघा २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रमुख धरणांची स्थिती
राज्यातील काही महत्त्वाच्या आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा उजनी धरण: ५० टक्के, कोयना धरण: ४९, टक्के, खडकवासला धरण साखळी: ४१ टक्के, गोसीखुर्द धरण: ३६ टक्के, जायकवाडी धरण: ३२ टक्के असा आहे.
मुंबईतही मोठी घट
मुंबई आणि ठाणे परिसराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सहा प्रमुख धरणांमध्ये सध्या एकूण ४२.६३ टीएमसी म्हणजेच ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात या धरणांमध्ये ७९ टक्के पाणीसाठा होता, म्हणजेच मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट झाली आहे.
पुढचा आठवडा कोरडाच जाणार
पुणे : मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूट सुमारे ३३ टक्के असून, पुढील आठवडाभर राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडेच राहील असा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.
डॉ. सानप म्हणाले की, आजघडीला कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा ६ टक्के अधिक पाऊस झाला असून, मध्य महाराष्ट्रातही ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील स्थिती अद्याप चिंताजनक असून येणारा संपूर्ण आठवडा राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडाच जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी स्थानिक हवामानातील बदलांमुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसेल. मराठवाड्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही, तर विदर्भात काही ठिकाणी केवळ वादळी वाऱ्यासह हलक्या सरी हजेरी लावू शकतात; मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहील आणि केवळ हलक्या सरी बरसतील. एकूणच, पुढील आठवड्यात पावसाचा जोर ओसरून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.