महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र रोजगारापासून वंचित; प्रियांका गांधी-वढेरा यांचा हल्ला

Maharashtra assembly elections 2024: महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेण्यात आल्याच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यंनी रविवारी पुन्हा एकदा सत्तारूढ भाजपवर हल्ला चढविला. काही मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याने महाराष्ट्र रोजगारापासून वंचित राहिल्याचे प्रियांका गांधी-वढेरा म्हणाल्या.
महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र रोजगारापासून वंचित; प्रियांका गांधी-वढेरा यांचा हल्ला
Published on

गडचिरोली/नागपूर : महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेण्यात आल्याच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यंनी रविवारी पुन्हा एकदा सत्तारूढ भाजपवर हल्ला चढविला. काही मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याने महाराष्ट्र रोजगारापासून वंचित राहिल्याचे प्रियांका गांधी-वढेरा म्हणाल्या. गडचिरोली जिल्ह्यातील एका प्रचारसभेत प्रियांका पुढे म्हणाल्या की, सत्तारूढ महायुतीचे नेते मूळ प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करताना त्या म्हणाल्या की, महिलांनी उत्तम जीवनमानासाठी मतदान करावे, केवळ दरमहा १५०० रुपये मिळत आहेत म्हणून मतदान करू नये.

सोयाबीनला भाव मिळेल

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव दिला जाईल. राज्यात जवळपास २.५ लाखांहून अधिक रिक्त पदे आहेत. फॉक्सकॉन, एअरबस यासारखे प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याने राज्याला रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. तरुणवर्ग रोजगारासाठी प्रयत्न करीत आहे, नवी कौशल्ये आत्मसात करीत आहे, तरीही त्यांना रोजगार मिळत नाही. रोजगाराच्या संधी नसल्याने युवक आत्महत्या करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुरक्षा आणि तिजोरी

‘एक है, तो सेफ है’ याबाबत प्रियांका म्हणाल्या की, सेफ या शब्दाचे ‘सुरक्षा आणि तिजोरी’ असे दोन अर्थ आहेत. मात्र, या देशात केवळ एकच उद्योगपती खऱ्या अर्थाने ‘सेफ’ आहे, कारण त्या उद्योगपतीला थेट तिजोरीपर्यंत पोहोचणे शक्य आहे. सर्वसामान्यांना मात्र संघर्ष करावा लागत आहे. विमानतळ, बंदरे आणि बड्या कंपन्या एकाच उद्योगपतीच्या नियंत्रणाखाली आहेत. सरकारची धोरणे एका व्यक्तीसाठीच अनुकूल आहेत. खरे तर सरकारने रोजगारनिर्मितीवर भर द्यावा, राष्ट्रीय संपत्तीचे एकाच व्यक्तीला वितरण करू नये, असे त्या म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in