पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान; फडणवीसांच्या हस्ते ‘नमो एक्स्प्रेस’ला भगवा झेंडा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नमो एक्स्प्रेस सोडण्यात आली.
पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान; फडणवीसांच्या हस्ते ‘नमो एक्स्प्रेस’ला भगवा झेंडा
Published on

मुंबई : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नमो एक्स्प्रेस सोडण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि भाविकांच्या प्रवासाचा शुभारंभ झाला. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ही व्यवस्था करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांना वारीचा सुलभ अनुभव मिळावा, या उद्देशाने नमो एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली होती. या ट्रेनच्या माध्यमातून एक हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक प्रवास करत आहेत.

मराठी मनाला आस लावणारी ही वारी वारकऱ्यांसाठी आणि मराठी माणसासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. विठ्ठलाच्या वारीची आस असलेल्या मुंबईतील वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी नमो एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, “प्रत्येकाला मनोमन इच्छा असते की, एकदा तरी वारीला जावे. मुंबईकरांनाही आपल्या धकाधकीच्या जीवनातून पंढरीला जाता यावे, यासाठी मुंबईतील विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी नमो एक्स्प्रेस ही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल!”

“प्रत्येकासाठीच आषाढीची वारी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे या काळात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात रंगून जातो. संतांना मानणारी, धर्माला जपणारी आणि राष्ट्रावर प्रेम करणारी ही सर्वच वारकरी मंडळी आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी कार्य करताना वेगळाच उत्साह जाणवतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती जपण्यासाठी महायुती सरकारने तीर्थदर्शन यासारख्या योजना अंमलात आणल्या आहेत,” असे लोढा यांनी सांगितले.

१६ जुलै रोजी मुंबईहून ही ट्रेन रवाना होईल, १७ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल. १८ जुलै रोजी हीच ट्रेन पुन्हा मुंबईला परत येईल. यावेळी, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in