'त्या' महिलेची व्यथा समजून घेऊन कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांच्या कार्यालयात दादर येथे राहणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली.
'त्या' महिलेची व्यथा समजून घेऊन कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस
Published on

मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. गुरुवारी संध्याकाळच्या वेळी अधिकारी व कर्मचारी घरी जाण्याच्या घाईत असताना फडणवीस यांच्या कार्यालयात दादर येथे राहणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली. दरम्यान, या महिलेला नेमके कोणी पाठवले? तिची व्यथा काय? हे समजून घेत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, बडे सनदी अधिकारी मंत्रालयात असतात. त्यामुळे मंत्रालय आणि परिसरातील सुरक्षा चोख असते. परंतु विविध कामानिमित्त राज्यभरातील लोक मंत्रालयात येत असतात. प्रत्येक ये-जा करणाऱ्यांची कसून चौकशी केली जाते. असे असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून सहस्त्रबुद्धे या महिलेने तोडफोड केल्याने खळबळ उडाली. ही महिला नेमकी कोण आहे? तिने असे का केले? याबाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची प्रारंभी ओळख पटली नव्हती. मात्र, नंतर तपासाअंती संबंधित महिला ही मनोरुग्ण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालय ‘हाय सिक्युरिटी झोन’मध्ये येते. याठिकाणी पास न घेता मंत्रालयात शिरलेली महिला कशी पोहचली? त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस काय करत होते? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

लाडक्या बहिणींचा राग अनावर - वडेट्टीवार

दरम्यान, मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचा इव्हेंट करण्यात व्यस्त असून संतप्त महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड केली, म्हणजे ‘लाडक्या बहिणीं’चा राग अनावर झाला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in