विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका; पुस्तिकेसाठी २० कोटींचा खर्च

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने राज्यातील इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक पुस्तिका प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका; पुस्तिकेसाठी २० कोटींचा खर्च
विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका; पुस्तिकेसाठी २० कोटींचा खर्च'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने राज्यातील इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक पुस्तिका प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

गेल्या काही वर्षांत जागतिक हवामान बदल, पर्यावरणीय बदल आणि औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे. या आपत्तींचा वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच आपत्ती व्यवस्थापनाची जाणीव निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या पुस्तिकेत महत्त्वाच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक आपत्तीच्या अनुषंगाने आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील उपाययोजना आणि आपत्तीनंतरची पुनर्बांधणी या तीन टप्प्यांतील मार्गदर्शनाचा समावेश असेल. तसेच विविध आपत्तींच्या वेळी काय करावे आणि काय करू नये, याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्टून पात्र

विद्यार्थ्यांना विषय समजावा यासाठी पुस्तिकेची मांडणी कथाकथन पद्धतीने करण्यात येणार आहे. आपत्तींचे प्रकार आणि त्यांची तीव्रता स्पष्ट करण्यासाठी छायाचित्रे, इन्फोग्राफिक्स आणि क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. पुस्तिकेच्या प्रस्तावना पृष्ठावर संपूर्ण आशयाचा आढावा देणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाचा क्यूआर कोडही देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्टून पात्र विकसित करण्यात येणार असून, प्रत्येक आपत्तीची माहिती सुमारे २०० ते ४५० शब्दांत दिली जाणार आहे.

आशय सोप्या, रंजक पद्धतीने मांडणार

आपत्तींची माहिती इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरक्रमानुसार मांडण्यात येणार आहे. याशिवाय आजपर्यंत घडलेल्या मोठ्या आणि भीषण आपत्तींचाही आढावा पुस्तिकेत असेल. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन, आपत्तींची कारणे आणि परिणाम, आपत्ती प्रतिबंधक उपाय, पूर्वसूचना यंत्रणा तसेच स्वतःसह इतरांचा बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी या बाबींवरही विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे वय आणि बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन पुस्तिकेतील आशय सोप्या आणि रंजक पद्धतीने सादर केला जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)