
मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, फटाके फोडायचे की पावसात भिजायचे, असा प्रश्न नागरिकांना सतावू लागला आहे. राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी आणि शनिवारीसुद्धा पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा घाट, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी नाशिक, नाशिक घाट, पालघर जिल्ह्यांला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.