दुष्काळाचे निकष ठरणार कळीचे

केंद्र सरकारने २०१६ मध्ये दुष्काळ संहिता जाहीर करून दुष्काळ घोषित करण्यासाठीचे निकष निश्चित केले होते. महाराष्ट्र सरकारने या संहितेच्या आधारे २८ जून २०१८ मध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या अटी-शर्तींचा उल्लेख असलेला शासन निर्णय जारी केला. त्यानुसार राज्यात दुष्काळ जाहीर केला जातो.
दुष्काळाचे निकष ठरणार कळीचे
दुष्काळाचे निकष ठरणार कळीचे'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : केंद्र सरकारने २०१६ मध्ये दुष्काळ संहिता जाहीर करून दुष्काळ घोषित करण्यासाठीचे निकष निश्चित केले होते. महाराष्ट्र सरकारने या संहितेच्या आधारे २८ जून २०१८ मध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या अटी-शर्तींचा उल्लेख असलेला शासन निर्णय जारी केला. त्यानुसार राज्यात दुष्काळ जाहीर केला जातो.

दुष्काळ घोषित करण्याच्या प्रक्रियेत केवळ अपुरा पाऊसच नव्हे तर पिकांची स्थिती, पेरणीचे क्षेत्र, वनस्पती निर्देशांक, जमिनीतील ओलावा, भूजलस्थिती आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी अशा विविध बाबींचा विचार केला जातो. त्यानुसार दुष्काळाचे मूल्यांकन टप्प्याटप्प्याने केले जाते.

प्रत्यक्ष पावसाची सामान्य पावसाशी तुलना

पहिला ट्रिगर किंवा निकषासाठी जून अथवा जुलै या दोन महिन्यांतील प्रत्यक्ष पावसाची सामान्य पावसाशी तुलना केली जाते. जून, जुलैचा प्रत्यक्ष पाऊस हा सामान्य पावसाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, कोरड्या कालावधीची अट स्वतंत्रपणे लागू नसली तरीही पहिला ट्रिगर लागू होऊ शकतो.जून ते सप्टेंबर या कालावधीतील प्रत्यक्ष पाऊस, त्या कालावधीच्या सामान्य पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यासही पहिला दुष्काळ ट्रिगर लागू होऊ शकतो.

... तर दुष्काळाची तीव्रता गंभीर

खरीप हंगामात ऑगस्टअखेर प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र सामान्य क्षेत्राच्या तुलनेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास मध्यम स्वरूपाचा दुष्काळ समजला जातो. हे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास गंभीर दुष्काळ समजण्यात येतो. प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीत पीक नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित गाव दुष्काळी म्हणून घोषित होण्यास पात्र ठरू शकते. पीक नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास दुष्काळाची तीव्रता गंभीर मानली जाते.

कोरडा कालावधी, पेरणी क्षेत्रातील घट

दुसऱ्या टप्प्यानंतर करण्यात येणाऱ्या प्रतिनिधिक पाहणी मध्येही ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान आढळल्यास मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आढळल्यास गंभीर दुष्काळ समजला जातो. एकंदरीत पावसातील तूट, कोरडा कालावधी, पेरणी क्षेत्रातील घट, उपग्रहाधारित वनस्पती निर्देशांक, जमिनीतील आर्द्रता, भूजल स्थिती, प्रत्यक्ष पीक नुकसान, आदी निकष दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत.

असा होतो एकत्रित विचार

पहिल्या टप्प्यात पाऊस आणि कोरड्या कालावधीसह अनिवार्य निकष तपासले जातात. दुसऱ्या टप्प्यात पिकांची स्थिती, पेरणी क्षेत्र, आर्द्रता आणि जलस्रोताशी संबंधित निकषांचा एकत्रित विचार केला जातो. मध्यम किंवा गंभीर दुष्काळाची शक्यता दिसून आल्यास तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली जाते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in