

सुजित ताजणे/ छत्रपती संभाजीनगर
यंदा राज्यातील दुष्काळाच्या झळा आता डेअरी प्रकल्पांपर्यंत येऊन ठेपल्या आहेत. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दूधधंद्याची नीटपणे बसलेली घडी पूर्णपणे विस्कळीत होण्याची परिस्थिती आहे. राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वीही अनेकदा दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. परंतु, यावेळचा दुष्काळ चटका लावणाराच आहे. असे असले तरी दुष्काळातही शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन घटू दिलेले नाही. इतर शेतमालासारखे दुधाचे नाही.
शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला कांदा किंवा इतर कोणत्याही शेतमालाचा भाव अचानक कोसळतो. त्यानंतर एका क्षणात त्या शेतीमालाची माती होते. दुधाचे तसे नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीत दुधाचा वाटा मोठा आणि महत्त्वाचा राहिला आहे. कारण, दुधाचे दर सतत स्थिर असतात. दुधाचे दर घटत नाहीत, मात्र, इतर शेतमालासारखे ते मोठ्या प्रमाणात कोसळतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर ओतावे लागते, असे नेहमी होत नाही.
‘एफडीए’ आयुक्तपदी मुंढेंची नियुक्ती पथ्यावर
दुधाला दर यापुढेही चांगलेच मिळतील. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या म्हणजेच एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची झालेली नियुक्ती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली. तुमच्या लक्षात येईल त्यांची नियुक्ती झाल्यानंतर दुधाच्या खरेदीदरात सतत बाढ झालेली आहे. गेल्या काही महिन्यात खरेदी दरात एकूण पाच रुपयांची वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना यापुढेही दुधाला चांगले दर मिळत राहतील. दुष्काळाची तीव्रता वाढत जात असताना दुसऱ्या बाजूला दुधासाठी मागणी वाढत राहील व त्यातून शेतकऱ्यांना खरेदी दरात एकूण ४-५ रुपयांची वाढ मिळण्यास अनुकूल स्थिती राहील. म्हणजेच आधी गायीच्या दुधासाठी शेतकऱ्याला प्रतिलिटर ३७ रुपये दर मिळत होता. तो वाढत जाऊन आता ४२ रुपयांपर्यंत गेला व यापुढेही हा दर वाढता राहील. त्यामुळे शेतकरी दुभती जनावरे जिवापाड सांभाळतील. परंतु कोरडवाहू भागात अडचणी वाढतील. तरी दर दहा दिवसांनी विक्रीचे पैसे हाती देणारे दूध हे एकमेव साधन शेतकऱ्यांच्या हाती आहे.
प्रतिकूल स्थितीतही दूध उत्पादक तरतील...
दुधाचे बाजार १०२ रुपयांनी कमी होतात आणि तसेच ते वाढतही जातात. दुधाच्या बाजारात तुलनेने स्थिरता असते. खासगी किंवा सहकारी दूध प्रकल्पांकडून खरेदी केलेल्या दुधाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे न चुकता ठरलेल्या तारखांना मिळत आहेत. त्यामुळे शेतातील कोणत्याही पिकाने दगा दिला तरी दूध आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दुधाचे पैसे हमखास मिळतीलच, अशा विश्वास दूध उत्पादक शेतकऱ्याला असतो. या विश्वासाला यापूर्वीच्या कोणत्याही दुष्काळात डेअरी उद्योगाने तडा जाऊ दिलेला नाही. तुम्हाला मी खात्रीने सांगतो की, या दुष्काळातदेखील शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जेदार दुधाला चांगली किंमत मिळेल. तसेच, दूध उत्पादक शेतकरीसुद्धा कितीही प्रतिकूल स्थिती आली तरी तरतील, ते चारा-पाण्याचे योग्य नियोजन करतील आणि निर्भेळ दुधाचा पुरवठा जिद्दीने चालू ठेवतील.
सरकारने नेमके काय करावे?
सरकारला सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. मात्र, चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन, पुरवठा झाला तरी दूध उत्पादकांना आधार मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती भागात शेतकऱ्याला कसेबसे चारा नियोजन करता येईल. परंतु, विदर्भ, मराठवाड्यात बारकाईने लक्ष द्यावे लागेल. अर्थात, तेथेही चाऱ्याची स्थिती अतिशय वाईट आहे, असे नाही. दुष्काळाबाबत शेतकऱ्यांना घाबरवून सोडणारी माहिती देण्यापेक्षा त्यांना दुष्काळाशी दोन हात करायला उपयुक्त ठरणारी माहिती द्यायला हवी. अर्थात, दुष्काळात कसे नियोजन करायचे हे शेतकरी जाणतो. दुष्काळी स्थितीतदेखील जगण्याचा मार्ग विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच शोधलेले होते. शेतकऱ्यांना दुष्काळाची चाहूल गेल्या एक दोन महिन्यांपासून लागलेली आहे. खरिपात शेतकऱ्यांना ज्वारी मिळालेली नाही. मात्र, त्याचा कडबा मिळालेला आहे.पीक हाती लागलेले नाही. परंतु, त्यातून थोडा चारा निश्चित मिळालेला आहे.
दुधाचे उत्पादन घटलेले नाही...
दुष्काळी स्थितीतदेखील राज्यातील शेतकरी दुधाचे उत्पादन घटू देत नाहीत. उलट मागील एक- दोन महिन्यात दुधाचे उत्पादन वाढलेले आहे. दुधामधील भेसळ कमी झालेली आहे. एफडीएच्या यंत्रणेने दूध भेसळीतील माफियांना वठणीवर आणलेले आहे. त्यामुळे निर्भेळ दुधाचे दर वाढले आहेत. दर वाढल्यामुळे शेतकरी अधिक काळजी घेत दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुधाला चांगला दर मिळू लागला की शेतकऱ्यांनादेखील गायीगुरांचे, गोठ्याचे नीट नियोजन करणे शक्य होते.भेसळीला ९० टक्के आळा बसला आहे. तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी दूध उत्पादकांकडून दुधात पाणी टाकण्याचे प्रकार होत होते. मात्र, त्यालाही आता आळा बसला आहे.
डेअरी उद्योगाने भूमिका महत्त्वाची...
डेअरी उद्योगाने या राज्यातील शेतकऱ्यांच्या निर्मेन दुधाला चांगला दर द्यावा, इतकीच अपेक्षा आहे. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला दिल्यास तो कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तापूर्ण उत्पादन विक्रीसाठी आणतो. शेतकऱ्याला दुधासाठी चांगला खरेदी दर द्यायलाच पाहिजे. दर चांगले मिळाल्यास तो कोठूनही चारा, पाणी आणेल, तो जनावरांना प्रतिकूल स्थितीत सांभाळेल. मात्र, हमाली खूप आणि दुधाला दाम नाही, अशी स्थिती झाल्यास शेतकरी मागे हटतो. त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने मदत करायची असल्यास ती चाऱ्यासाठी करावी आणि डेअरी उद्योगाने मदत करायची असल्यास शेतकऱ्याला चांगला दर द्यावा, असे वाटते, सध्या राज्यातील शेतकरी रोज अंदाजे एक कोटी ६० लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा करीत आहे. पुढे दुष्काळाची तीव्रता वाढत जाईल. पण, शेतकऱ्यांना चांगला दर दिल्यास ते ऐन दुष्काळातदेखील दूध पुरवठघात घट येऊ देणार नाहीत, अशी खात्री आहे.
शेतकऱ्यांना संघर्ष करावाच लागेल
मात्र दुष्काळी स्थितीमुळे पाणी व चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर दूध धंद्याचे सध्याचे अर्थचक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी शेतकरीसुद्धा ऐन दुष्काळात स्वतःचा दूध धंदा सावरतील, त्यासाठी खूप धडपड करतील. कारण, हमखास पैसा हवा असल्यास त्यासाठी संघर्ष करावाच लागेल, हे दूध उत्पादक शेतकरी चांगला जाणतो, असे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.