

पुणे : यंदा राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, यामुळे मराठवाड्यातील अनेक कुटुंबांवर रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी पुण्याकडे स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते. सामान्यतः ऊसतोड कामगारांना वर्षातून सुमारे १८० दिवसांचे काम मिळते; मात्र यंदा दुष्काळामुळे साखर कारखाने केवळ ६० दिवसच सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कामगारांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर घटणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, तसेच या स्थलांतरामुळे पुणे शहराच्या यंत्रणेवरही मोठा अतिरिक्त ताण पडणार आहे, असा इशारा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ देविदास तुळजापूरकर यांनी दिला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील गांधी भवन येथे 'महात्मा गांधी सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले आहे. 'फिल्म आणि चर्चा' कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील आर्थिक घडामोडींवर प्रकाश टाकणाऱ्या, दिग्दर्शक व लेखक वरुण सुखराज यांच्या 'द ग्रेट इंडियन इल्युजन' या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर झालेल्या विशेष चर्चेत तुळजापूरकर आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी संवाद साधताना बँकिंग व्यवस्थेवर सडेतोड भाष्य केले.
तुळजापूरकर यांनी बँकिंग क्षेत्रातील त्रुटींवर बोट ठेवताना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीवर थेट प्रश्न उपस्थित केले. पीएमसी बँकेत घडलेल्या गैरव्यवहाराच्या घडामोडी रिझर्व्ह बँकेच्या वेळीच लक्षात का आल्या नाहीत, असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला.
डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रश्न जनतेने मांडावेत
डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय केवळ सत्ताधाऱ्यांनी किंवा प्रशासनानेच घेणे योग्य नसून सामान्य नागरिकांनीही त्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. व्यवस्थेतील मनमानी कारभाराला उघडपणे विरोध करून नियमांवर बोट ठेवण्याची आणि उत्तरदायित्व मागण्याची ठोस भूमिका प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे, असे आवाहन बागाईतकर यांनी शेवटी केले.