पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट मदत; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही, संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता १९७२ सालापेक्षाही अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत असून सरकार शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे वाऱ्यावर न सोडता सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट मदत; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही, संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट मदत; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही, संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीX| @Dev_Fadnavis
Published on

मुंबई : राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता १९७२ सालापेक्षाही अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत असून सरकार शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे वाऱ्यावर न सोडता सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी दुष्काळी भागाचा दौरा केला. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुढील काही महिने अतिशय आव्हानात्मक असून या काळात धीर सोडू नका. संकटाचा सामना आपण सर्वांनी एकजुटीने करूया, असे आवाहन फडणवीस यांनी बळीराजाला केले.

“दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने गतीने पावले उचलली आहेत. दुष्काळाबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे कृषिपंप वीज बिल यापूर्वीच माफ केले असून, यापुढेही त्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

डोळ्यांसमोर करपलेली पिके, पिण्याच्या पाण्याची चिंता, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न आणि डोक्यावर वाढत चाललेले कर्जाचे ओझे अशा दुहेरी-तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात प्रकर्षाने समोर आल्या.

३ दिवसांत दुष्काळाची अधिसूचना काढणार- फडणवीस

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतला असून, येत्या तीन दिवसांत दुष्काळाची पहिली अधिसूचना काढण्यात येईल. शासन या गंभीर काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

  • लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा गावातील खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी

  • दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन

  • शेतकऱ्यांना अन्नधान्यासह आवश्यक ती सर्व मदत करण्याचा निर्णय

  • जलसंधारणाची आणि रोजगार निर्मितीची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणार

शेतकऱ्याला हुंदका अनावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील जाऊ आणि औसा तालुक्यातील खरोसा परिसरातील शिवारात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी करपलेले सोयाबीन, पाण्याअभावी झालेली पिकांची दुरवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान एका शेतकऱ्याने आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडताना भावनांचा बांध फुटला. मुख्यमंत्र्यांना कवटाळून नूर पटेल रडू लागले. मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा हात हातात घेऊन धीर दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in