

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीच्या उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांची आखणी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यासगट नेमला आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट राज्यात यापूर्वी तसेच अन्य राज्यांमध्ये राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांचा अभ्यास करून दुष्काळावर मात करण्याबाबत सरकारला शिफारसी करणार आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना सूचविण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या उपसमितीच्या २९ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत विविध उपाययोजनांद्वारे दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने मंगळवारी अभ्यासगटाबाबतचा शासन निर्णय जारी केला.
दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने अभ्यासगटाच्या कामात चारा नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. उपलब्ध चारा, भविष्यात अपेक्षित असलेले चाऱ्याचे उत्पादन आणि पुढील काळातील गरज लक्षात घेऊन चारा नियोजन करण्याचे निर्देश अभ्यासगटाला देण्यात आले आहेत.
या अभ्यासगटात वित्त, नियोजन, ऊर्जा, वने, मदत आणि पुनर्वसन, सहकार, मृद आणि जलसंधारण, जलसंपदा, कृषी, ग्रामविकास तसेच पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून उपाययोजनांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय दुष्काळाशी संबंधित अन्य अनुषंगिक बाबींचाही अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विषयाच्या गरजेनुसार अन्य विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अभ्यासगटाच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याची मुभा देण्यात आली आहे.