काही मिनिटांतच कळणार बनावट औषधे; ड्रग डिटेक्शन मशीन करणार औषधांची तपासणी, ८ अत्याधुनिक रमन स्पेक्ट्रोस्कोपी मशीन

दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासह गुणवत्तापूर्ण औषध रुग्णांना देणे गरजेचे आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधे गुणवत्तापूर्ण की, बनावट याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषधांची तपासणी करण्यात येणार असून दोन ते तीन मिनिटांत रिपोर्ट मिळणार आहे.
काही मिनिटांतच कळणार बनावट औषधे; ड्रग डिटेक्शन मशीन करणार औषधांची तपासणी, ८ अत्याधुनिक रमन स्पेक्ट्रोस्कोपी मशीन
काही मिनिटांतच कळणार बनावट औषधे; ड्रग डिटेक्शन मशीन करणार औषधांची तपासणी, ८ अत्याधुनिक रमन स्पेक्ट्रोस्कोपी मशीन X|iprakashabitkar
Published on: 

मुंबई : दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासह गुणवत्तापूर्ण औषध रुग्णांना देणे गरजेचे आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधे गुणवत्तापूर्ण की, बनावट याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषधांची तपासणी करण्यात येणार असून दोन ते तीन मिनिटांत रिपोर्ट मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रात आठ अत्याधुनिक रमन स्पेक्ट्रोस्कोपी मशीन खरेदी करण्यात आल्या असून महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

औषधांच्या गुणवत्तेतील संभाव्य त्रुटी आणि संशयास्पद औषधांची जलद ओळख पटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्याधुनिक रमन स्पेक्ट्रोस्कोपी ड्रग डिटेक्शन मशीन कार्यान्वित केली आहेत. प्रत्येक मशीनसाठी एक कोटी २० लाख रुपये याप्रमाणे आठ मशीन खरेदी करण्यात आल्या असून, त्यासाठी एकूण नऊ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या यंत्रणेची सुरुवात केली.

मोठ्या सरकारी रुग्णालयांपासून ते ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य केंद्रांपर्यंत पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. या मशीनमुळे औषधांच्या प्राथमिक तपासणीला गती मिळेल आणि रुग्णांना सुरक्षित औषधे उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

आठ शहरांत तपासणी मोहीम

ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि लातूर येथे या आठ मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मशीन चालवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यामध्ये एका फार्मासिस्टचा समावेश असेल.

अशा प्रकारे एकूण १६ अधिकारी औषधांच्या तपासणीसाठी कार्यरत राहणार आहेत. सरकारी आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा होणाऱ्या तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र फिरते पथकही तयार करण्यात आले आहे. मशीनचा पुरवठा करणारी कंपनी देखभाल आणि तांत्रिक सहाय्याची जबाबदारी सांभाळणार आहे.

महिनाअखेरीस ३,३०० डॉक्टरांची भरती

सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत तीन हजार ३०० डॉक्टरांची नियुक्ती करण्याची माहिती आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिली. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक हजार ४०० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये ६०० विशेषज्ञ डॉक्टर आणि ८०० एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरअखेरीस बीएएमएस पदवीधारक एक हजार ९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.

पाच हजार औषधांचा डेटाबेस

या मशीनमध्ये सुमारे पाच हजार औषधांच्या रासायनिक संरचनेचा डेटाबेस उपलब्ध आहे. गोळ्या, कॅप्सूल, द्रवरूप औषधे आणि कफ सिरप यांची प्राथमिक तपासणी या यंत्राद्वारे करता येणार आहे. लेसर किरण एखाद्या पदार्थावर टाकल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रकाशीय प्रतिक्रियेचे विश्लेषण करून औषधाचे रासायनिक स्वरूप ओळखले जाते. या प्रक्रियेत औषधाचा ‘केमिकल फिंगरप्रिंट’ तयार होतो. त्याची डेटाबेसमधील अपेक्षित रासायनिक संरचनेशी तुलना करून संभाव्य विसंगती शोधता येते. मात्र या मशीनद्वारे होणारी तपासणी ही प्राथमिक स्वरूपाची आहे. त्यामुळे औषध बनावट असल्याचा किंवा त्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा अंतिम निष्कर्ष केवळ या तपासणीवरून काढला जाणार नाही.

संशयास्पद औषधांची प्रयोगशाळेत तपासणी

मशीनच्या प्राथमिक तपासणीत औषधाच्या संरचनेत विसंगती आढळल्यास संबंधित औषधाचा नमुना पुढील तपासणीसाठी राष्ट्रीय चाचणी आणि अंशांकन प्रयोगशाळा मान्यता मंडळाकडून (एनएबीएल) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधित औषध कंपनीविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल. गंभीर अनियमितता आढळल्यास कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाईही होऊ शकते, असे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in