मुंबई : जगातील ११व्या अर्थव्यवस्थेवरून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत महाराष्ट्राने मजल मारली आहे. महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत असून शक्तिपीठ समृद्ध महामार्गाने महामार्गाचे जाळे विस्तारले जातेय. महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोठा वाटा असून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे. हा प्रकल्प २०२६ च्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना १२ तास दिवसाची वीज मिळेल. त्यावेळी १०० टक्के हरित वीज देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्राचे विशेष योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, मुख्य सचिव राजेश कुमार, अमृता फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ, मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, भारतीय सेना, नौसेना, वायुसेना, भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यातून भारतावरील होणारे हल्ले परतवून लावले. यामुळे जगाला देखील नवीन भारत काय आहे, हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजले आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या-ज्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचेही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्ते, विमानतळसोबत वाढवण बंदरचे काम हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पाणीसाठा तयार करणारे महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य!
सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. विशेषतः नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा, नळगंगा योजना असेल किंवा समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे, विविध नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणणे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीला, उद्योगाला, पिण्याचे पाणी देण्याकरिता मुबलक अशा प्रकारचे पाणी साठे तयार करणारे महाराष्ट्र एक महत्त्वाचे राज्य होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देशातील ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रातून!
भारतामध्ये थेट परदेशी गुंतवणूक येते, त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती राज्यामध्ये होत आहे. वस्तुनिर्माण, आयात-निर्यात, स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक मोठी विकासाची घोडदौड सुरू आहे. एकीकडे उत्तम अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत मानव संसाधन विकसित करण्याकरिता महाराष्ट्राने प्रयत्न सुरू केले आहेत. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेत योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.