आर्थिक स्थिती ठणठणीत! राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; हिवाळी अधिवेशनाची अखेर सांगता

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. २०२९-३० दरम्यान महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेले देशातील पहिले राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला.
आर्थिक स्थिती ठणठणीत! राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
आर्थिक स्थिती ठणठणीत! राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्तीPhoto : X (@Dev_Fadnavis)
Published on

नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य असून २०२९ ते २०३० दरम्यान महाराष्ट्र हे देशातील एक ट्रिलिनय डॉलरची अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य असेल, याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या तिजोरीत खूप पैसे नसले तरी आजघडीला महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले आहे. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक आहे. असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचा दावा केला.

ते म्हणाले की, “आपण महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. त्यामध्ये २०४७ चा विकसित महाराष्ट्र कसा असेल, याचा रोडमॅप तयार केला आहे. २०३०चा पहिला टप्पा, २०३५चा दुसरा टप्पा आणि २०४७चा तिसरा टप्पा आहे. राज्यातील विकासासाठी कर्ज उभारावे लागते. प्रत्येक राज्य ते कर्ज उभारते. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि एफआरबीएमने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. त्याच्यावर आपण गेलो तर अर्थव्यवस्था अडचणीत आली, असा त्याचा अर्थ होतो. आपण २०२५-२६चे अर्थसंकल्पीय अंदाज आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या १८.८७ टक्के एवढे कर्ज घेतले आहे. २५ टक्क्यांच्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. देशात अशी फक्त तीन राज्ये आहेत, त्यांचे हे दायित्व २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि ओरिसा यांचा समावेश आहे, हे सांगताना मला आनंद होतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा मांडला. “अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल करताना सभागृहातील सर्वांनी रचनात्मक कामातून राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र यावे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना सकारात्मकता आणि विकासकेंद्रित दृष्टिकोन आवश्यक आहे. ‘अब आगे बढ़ चुका हूँ मैं,… अब पग नहीं रुकने वाले,’ असे म्हणत त्यांनी विकासाच्या मार्गावर राज्याची वाटचाल थांबणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

“मुंबई महाराष्ट्राचीच होती, आहे आणि कायम राहील. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला असून यासंदर्भात कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाला २१ पानांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यांच्या तत्त्वाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र चालत राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

राजकोशीय वित्तीय तूट ही ३ टक्क्याच्या आत असणे गरजेचे आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे पैसे देऊनही आपली वित्तीय तूट ३ टक्क्याच्या आतच आहे. सरत्या वर्षात आपण वित्तीय तूट २.७६ टक्के इतकी मर्यादित ठेवली. या निकषातही आपली अर्थव्यवस्था कुठेही दिवाळखोरीकडे निघाली नाही. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक महाराष्ट्र सरकारने केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा रेहमान डकैत कोण? - शिंदे

सध्या चर्चेत असलेल्या धुरंदर चित्रपटातील संवाद ऐकवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही. कोविड असो वा मिठी नदी, प्रत्येक ठिकाणी यांनी दरोडा घातला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ आहेत, आम्ही तर त्यांना पाणी पाजणारे धुरंधर आहोत. इलाका किसी का भी हो, धमाका महायुती करेगा. ‘हमारी सारी योजना हैं गेमचेंजर, कॉर्पोरेशन का इलेक्शन जित कर हम ही होंगे धुरंधर,” अशी शेरोशायरीही त्यांनी केली.

नागपूरचे अधिवेशन म्हणजे निवडणुकीचा जुमला -विरोधक

नागपूरच्या अधिवेशनात विदर्भाच्या पदरात काहीच पडले नसल्याने विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. “हे अधिवेशन म्हणजे केवळ निवडणुकीचा जुमला असून, सरकारने विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे नाव सुद्धा घेतले नाही," अशा शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारचा समाचार घेतला.

logo
marathi.freepressjournal.in