दहा वर्षांत अर्थव्यवस्था तिप्पट; राज्य ५ लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठणारच - फडणवीसांचा विश्वास

गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली असून हाच वेग कायम ठेवून आपण पाच ट्रिलियनचा टप्पा गाठू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
दहा वर्षांत अर्थव्यवस्था तिप्पट; राज्य ५ लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठणारच - फडणवीसांचा विश्वास
छायाचित्र : X (Devendra Fadanvis)
Published on

मुंबई : गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली असून हाच वेग कायम ठेवून आपण पाच ट्रिलियनचा टप्पा गाठू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत त्यांनी चौफेर टोलेबाजी केली.

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान २०४७ पर्यंत पाच लाख कोटी अर्थात ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची असून त्यातून दरवर्षी १० लाख रोजगार तयार करायचे आहेत, असे नमूद करून फडणवीस म्हणाले की, वित्तीय शिस्त पाळून वित्तीय तूट अडीच टक्क्यांखाली आणायची आहे. यासाठी राज्यात शंभर उपक्रम घेतले असून त्याचे व्हिजन मॅनेजमेंट तयार केले आहे. मॅकेन्जीसारख्या कंपनीचा सल्ला त्यासाठी घेत आहोत. हे पुस्तक तयार करण्याइतके सोपे नाही. बजेट ट्रिलियन डॉलर नाही करायचे, अर्थव्यवस्था तयार करायची आहे. आज अर्थव्यवस्था ५१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, आणखी ४० लाख कोटींपर्यंत विस्तारीत करायची आहे. सन २०१२-१३ मध्ये अर्थव्यवस्था तेरा लाख कोटी होती. आता ती तिप्पट झाली आहे. जगात काही देशांची अर्थव्यवस्था देखील ट्रिलियन डॉलर नाही, असेही ते म्हणाले.

कुंभमेळ्यामुळे ब्रँडिंग

कुंभमेळ्याबाबतच्या आक्षेपांना उत्तर देताना ते म्हणाले की, कुंभमेळा हा दर साडेबारा वर्षांनी येणारा आहे. जगात इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेही मेळावा होत नाही. ज्या व्यवस्था आपण करतोय, त्या कुंभ मेळ्यापुरत्या मर्यादित नाहीत. पर्यावरणसाठी उपाययोजना करतोय. रस्ते रुंदीकरण, एअरपोर्ट, रिंग रोड करतोय. त्यामुळे धार्मिक व इतर पर्यटन वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘युवा प्रशिक्षण म्हणजे पर्मनंट नोकरी नाही’

भास्कर जाधव यांनी युवा प्रशिक्षण अभियानाबाबत काही आक्षेप नोंदवले होते. त्याबाबत खुलासा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियान हे ११ महिन्यांसाठी असणार ते आधीच घोषित केले होते, इतरत्र नोकरीला जाताना उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी त्यांना अनुभवपत्र देण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी युवकांना पर्मनंट करणार हे सांगितल्याचे भास्कर जाधव म्हणाले. तसे रेकॉर्ड असेल तर पाठवून द्या, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले. चांगल्याला चांगलं म्हणायला शिका.

ट्रम्पही दावोसमध्ये राहतात

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, पूर्वी सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनीही डावोस दौरा करून करार केला होता. त्याचे फोटो आहेत. डावोस हे छोटे गाव असले तरी डोनाल्ड ट्रम्पदेखील तिथे दोन-दोन दिवस राहतात. जगासोबत चालायचं आहे तर तुम्हाला तिथे राहावंच लागतं. राज्याची मोठी चर्चा तिथे होते. कंपन्यांचे परकीय गुंतवणूकदार असतात त्यांची इच्छा असते करार तिथे व्हावे. कंपन्या तिथे आपल्या बैठका ठेवतात, थेट परदेशी कंपन्या आपल्याकडे येत नाहीत. मंत्रालयात बोलावूनही करार करता येतात. पण, उत्सव केला की लोकांपर्यंत पोहोचता येतं, मार्केटिंग होतं, अधिक लोकांपर्यंत पोहोचता येतं.

logo
marathi.freepressjournal.in