स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेना-रिपब्लिकन सेनेची युती

एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीविषयी चर्चा सुरू होऊन मराठी मतं एकत्रित येण्याची शक्यता असताना शिंदेसेना आणि रिपब्लिकन सेना युतीची घोषणा करण्यात आली आहे.
स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेना-रिपब्लिकन सेनेची युती
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेशी आघाडी जाहीर केली. या निर्णयामुळे मुंबईसह नागरी भागांमधील दलित मतांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेसोबत हातमिळवणी करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही भागीदारी सामाजिक न्याय आणि समान मूल्यांवर आधारित आहे. आम्ही मिळून वंचितांसाठी बळकट आवाज निर्माण करू आणि सर्वसमावेशक विकासासाठी काम करू.

मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांबरोबरच जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये ही आघाडी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगण्यात आले.

एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीविषयी चर्चा सुरू होऊन मराठी मतं एकत्रित येण्याची शक्यता असताना शिंदेसेना आणि रिपब्लिकन सेना युतीची घोषणा करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू असलेले आनंदराज आंबेडकर यांनी या आघाडीचे स्वागत करताना, ही ऐतिहासिक वेळ आहे. ही भागीदारी दलित आणि सामान्य जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारा एक नवीन राजकीय पर्याय उभा करेल, असा विश्वास व्यक्त केला.

आनंदराज आंबेडकर यांनी काही दशकांपूर्वी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आला नव्हता. रिपब्लिकन सेनेचा प्रभाव मुख्यतः महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आहे.

logo
marathi.freepressjournal.in