

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर महापालिकांसाठी १५ लाख रुपये, तर पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे महानगरपालिकांसाठी १३ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत ही दीड पट वाढ असल्याने आगामी निवडणुकीत होऊ दे खर्च असे म्हणावे लागणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणूक प्रचारासाठी अधिक आर्थिक मोकळीक मिळणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांच्या उमेदवारांसाठी सहा लाख रुपयांची आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाख रुपयांची खर्च मर्यादा होती. मात्र बदलत्या काळानुसार आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. महागाई, प्रचार साधनांचे दर, डिजिटल माध्यमांवरील खर्च आणि वाहनभाडे यांसारख्या बाबींचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतल्याचे समजते.
अशी खर्चाच्या मर्यादेत वाढ
-मुंबई, पुणे, नागपूर महापालिका - १५ लाख रुपये
-पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे महापालिका - १३ लाख रुपये
-कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार - ११ लाख रुपये
