शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’; ठाकरेंच्या शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह कायम, ‘पिपाणी’ला वगळले; ४३५ पक्षांची नवी यादी जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पात्र ४३५ राजकीय पक्षांची अधिकृत यादी मंगळवारी जाहीर केली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’; ठाकरेंच्या शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह कायम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’; ठाकरेंच्या शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह कायम
Published on

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पात्र ४३५ राजकीय पक्षांची अधिकृत यादी मंगळवारी जाहीर केली. या संदर्भातील शासन राजपत्र ८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवले आहेत.

राजपत्रातील यादीत ५ राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्रातील ५ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर राज्यांतील ९ राज्यस्तरीय पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या ४१६ राजकीय मान्यताप्राप्त असलेल्या पक्षांची चिन्हांसह यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे ‘घड्याळ’ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चारही चिन्हांना नावांसहित वेगळे स्थान देण्यात आले आहे.

‘पिपाणी’ चिन्हाला वगळले

न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले. मात्र लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे दोन चिन्ह असल्याने मत विभाजन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. पिपाणी हे चिन्ह काढून टाकावे अशी मागणी केली होती. आयोगाने जाहीर केलेल्या राजपत्रात त्यानुसार पिपाणी या चिन्हाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in