महायुतीला ‘दे धक्का’! महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत

Maharashtra MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला महाविकास आघाडीने जबर धक्का दिला.
महायुतीला ‘दे धक्का’! महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत
महायुतीला ‘दे धक्का’! महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत
Published on: 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला महाविकास आघाडीने जबर धक्का दिला. महाविकास आघाडीने तीन जागांवर वर्चस्व गाजवले तर महायुतीला दोन जागांवरच समाधान मानावे लागले. जवळपास ३२ तास चाललेल्या मतमोजणीत ‘काँटे की टक्कर’ सुरू असलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होम ग्राउंडवरच धक्का दिला असला तरी यासंदर्भातील अधिकृत निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला नव्हता.

भाजपला फक्त एकाच जागी विजय मिळवता आला, त्यांचे दोन उमेदवार पराभूत झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला, तर पुणे पदवीधर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांत मविआच्या उमेदवारांनी बाजी मारली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपला धक्का दिला. राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला.

या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात झाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सलग तीन वेळा या जागेवर निवडून आलेले विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. चव्हाण हे महायुतीसमर्थित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार होते. पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू असताना पाटील यांनी आघाडी कायम राखली. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पाटील यांना दिलेल्या पाठिंब्याचीही या निकालाच्या संदर्भात त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा झाली.

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची बाजी

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा ९,७०० मतांनी पराभव केला. हर्षदा यांना १ लाख १३ हजार ९५ मते मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनील मोदी यांना ३,०६६ मते मिळाली. या मतदारसंघात भाजपला विजयाची अपेक्षा होती; मात्र निकाल विरोधी उमेदवाराच्या बाजुने लागला.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे गावडे वरचढ

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी शिवसेनासमर्थित अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा पराभव केला. मतमोजणीच्या २८ फेऱ्यांनंतर गावडे यांना २३,११७, तर सानप यांना १६,३४७ मते मिळाली. गावडे यांनी आपला विजय शिक्षक समुदायाला समर्पित केला. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांना पैसे वाटल्याच्या किंवा शैक्षणिक संस्थांवर मतदानासाठी दबाव आणल्याच्या आरोपांचाही त्यांनी इन्कार केला.

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेचे सरनाईक जिंकले

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला. त्यांना १६,६६३ मते मिळाली. विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा १६,१३४ होता. काँग्रेसच्या अदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. सरनाईक यांच्या विजयाचा शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी बाजीगर

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार चुरस सुरू होती. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी अखेरच्या क्षणी ४ हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी ही पिछाडी भरून काढत जवळपास अडीच हजारांच्या मताधिक्याने विजय संपादन केला.

पाचही मतदारसंघांत २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार असल्याने या निवडणुका घेण्यात आल्या. या निकालांतून राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील चुरशीचे राजकीय चित्र समोर आले आहे.

पक्षाने कठोर आत्मचिंतन करावे -प्रफुल पटेल

मुंबई : विधानपरिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संघटनात्मक कामकाजावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी पक्षाला संघटनेतील सुधारणांसाठी कठोर आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. “विधानपरिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहे. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आत्मचिंतन करावे लागेल,” असे पटेल म्हटले आहे.

एकत्रित लढलो असतो तर ५-० असा विजय झाला असता -शशिकांत शिंदे

पुणे आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात जनतेने आणि सुशिक्षित पदवीधरांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा दृढ विश्वास दाखवून दिला आहे. सत्ता आणि अफाट पैशाचा गैरवापर होऊनही मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला आहे. जर महाविकास आघाडीने निवडणुकीच्या दोन महिनेआधीच समन्वय साधून, कोणत्याही पक्षाची प्रतिष्ठा न करता संयुक्त उमेदवार दिले असते, तर विधानपरिषदेच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीने ५-० अशी ऐतिहासिक मुसंडी मारली असती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त दिली.

विजयी उमेदवार

  • नागपूर पदवीधर : अभिजीत वंजारी (काँग्रेस)

  • पुणे शिक्षक मतदारसंघ : कौस्तुभ गावडे (भाजप)

  • अमरावती शिक्षक : किरण सरनाईक (शिवसेना शिंदे)

  • पुणे पदवीधर : हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी श.प.)

  • मराठवाडा पदवीधर : डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी श.प.)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in