शिंदे, अजितदादा गटात भाजपच्या १६ नेत्यांची घुसखोरी!

विधानसभा निवडणुकीत भाजपने १४६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अनेक बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, त्याचवेळी भाजपने पक्षातील आपल्या १६ नेत्यांना महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात घुसवून त्या पक्षाची उमेदवारी मिळवून दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपने १४६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अनेक बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, त्याचवेळी भाजपने पक्षातील आपल्या १६ नेत्यांना महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात घुसवून त्या पक्षाची उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजप निवडणुकीत १६० पेक्षा अधिक जागा लढवत असल्याचे बोलले जात आहे. तसेच मित्रपक्षांमध्ये घुसवलेले भाजपचे नेते निवडून आल्यानंतर कोणती भूमिका घेणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपात मित्रपक्षांना दिलेल्या जागांवरही भाजपने अप्रत्यक्षपणे तिरक्या चालीने दावा केला आहे. भाजपचे १२ नेते हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढणार आहेत, तर ४ नेत्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, मात्र ती जागा शिंदे किंवा अजित पवारांकडे जागावाटपात गेल्याने या उमेदवारांनी फॉर्म भरण्याआधीच त्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.

शिंदे सेनेतील भाजप उमेदवार

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना शिंदे गटाकडून कुडाळ-मालवणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांनादेखील शिंदे गटाने कन्नड विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. माजी भाजप नेते राजेंद्र गावीत हे पालघर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विलास तरे यांनी बोईसरमधून विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी पूर्वमधून भाजपच्या संतोष शेट्टी यांनी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. अंधेरीतील भाजपचे वरिष्ठ नेते मुरजी पटेल यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. संगमनेर मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे-पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते.

पण ती जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे भाजपचे अमोल खताळ यांना शिवसेनेतून तिकीट देण्यात आले. शायना एनसी या वरळीतून भाजपच्या उमेदवार असतील, असे बोलले जात होते. बरीच वर्षे त्या भाजपसाठी काम करत आहेत, पण त्यांना शिंदे सेनेतून मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. करमाळा मतदारसंघात दिग्विजय बागल यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण ती जागा महायुतीत शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. नेवासामधून विठ्ठल लंघे आणि बाळापूरचे बळीराम शीरसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते दोघेही याआधी भाजपमध्ये होते.

अजितदादा गटातील भाजप उमेदवार

याचबरोबर भाजपमधून अजित पवार गटात सामील झालेल्या माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, माजी खासदार संजयकाका पाटील आणि निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in