
मुंबई : भाजप हा राजकारणातील 'पार्टी विथ डिफरन्स' किंवा शिस्तबद्ध पक्ष स्वतःला म्हणवून घेतो. आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे, असा भाजपवासीयांचा समज आहे. आता त्याच भाजपच्या काचेच्या महालाला बंडखोरीचे तडे गेल्याचे या विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. बोरिवली, सांगली, अकोला येथे इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र विधानसभेची यंदा निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची अंतिम घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षात काम करूनही उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी आता बंडखोरी केली असून, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी भाजपला अडचणीत आणणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपचे नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बोरिवलीतून भाजपने संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना संजय उपाध्याय व गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय हे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर उमेदवारी अर्ज भरायला आले. तेव्हा गोपाळ शेट्टी यांचे समर्थक तेथे उपस्थित होते. तेव्हा 'दादागिरी नही चलेगी', 'गोपाळ शेट्टी जिंदाबाद' अशा घोषणा शेट्टी समर्थकांनी दिल्या. तर 'महायुती'च्या समर्थकांनी 'मोदी, मोदी'च्या घोषणा दिल्या. दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. मात्र, समर्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पियुष गोयल तिथून निघून गेले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचे उमेदवार संजय उपाध्याय हे विजयी होतील, असे गोयल यांनी नंतर स्पष्ट केले.
गोपाळ शेट्टी म्हणाले की, जनतेच्या पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मी बोरिवलीच्या जनतेसोबत आहे. संजय उपाध्याय हे भाजपचे चांगले कार्यकर्ते आहेत. पण ते स्थानिक नाहीत. पक्षाचे काही निर्णय चुकीचे आहेत. पण, आपण त्याबद्दल काहीही बोलणार नाही.
मुंबादेवी मतदारसंघातून अतुल शहा यांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. मात्र, या मतदारसंघातून शायना एनसी यांना तिकीट दिल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४० वर्षे मी पक्षासाठी काम करत आहे. आमदार म्हणून काम केल्यानंतर मी मनपा नगरसेवकपदाची निवडणूकही लढलो. स्थानिकांना डावलून कोणताही उमेदवार कोणत्याही मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा करणे हे धोरण चुकीचे आहे. मी अपक्ष उमेदवारी दाखल करणार होतो. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर मी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला, असे शहा म्हणाले.
तसेच माजी मंत्री प्रकाश मेहता हेही नाराज असल्याचे समजते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मात्र ते महायुतीच्या उमेदवाराच्या नाकात दम आणू शकतात.
ठाण्याचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांना ओवळा-माजीवडा मतदारसंघात उमेदवारी पाहिजे होती. त्यामुळे तेही नाराज आहेत.
सांगली जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्याविरोधात भाजपचे स्थानिक नेते सम्राट महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजीत देशमुख पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अकोल्यात भाजपने विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात भाजपचे सरचिटणीस डॉ. अशोक ओळांबे यांनी 'प्रहार जनशक्ती' पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.