बंडोबांना थंड करण्याचे आव्हान; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत

बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पार शकले झाल्यामुळे एकूण ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक पक्ष निवडणुकीत उभे असल्यामुळे जितके उमेदवार, तितकीच बंडखोरीही वाढीस लागली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पार शकले झाल्यामुळे एकूण ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक पक्ष निवडणुकीत उभे असल्यामुळे जितके उमेदवार, तितकीच बंडखोरीही वाढीस लागली आहे. इमाने-इतबारे गेली कित्येक वर्षे पक्षाची सेवा करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने राज्यातील बहुतेक एक सर्वच मतदारसंघात बंडखोरीचे पेव फुटले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आटोपल्यानंतर आता बंडोबांना थंड करण्याचे आव्हान पक्षप्रमुखांसमोर उभे ठाकले आहे.

महायुती किंवा महाविकास आघाडीमधून तिकीट मिळत नसल्याने विविध राजकीय पक्षांतील नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यामुळे बंडखोरीचा मोठा फटका सहन करावा लागणार असल्यामुळे त्याठिकाणची हक्काची सीट धोक्यात आल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. येत्या सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्याआधी बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत सुरू आहे. बंडखोरी केलेल्यांची समजूत काढत त्यांना विधान परिषदेवर संधी तसेच महामंडळे किंवा पक्षांतर्गत बढती देण्याचे 'गाजर' पक्षश्रेष्ठींकडून दाखवले जात आहे. मात्र, या आश्वासनालाही न जुमानता काहींनी बंडखोरी कायम ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे.

मुंबईसह विविध ठिकाणी महायुतीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. आता ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, त्या ठिकाणची माहिती तीनही पक्षाचे प्रमुख नेते घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लवकरच बंडोबांना थंड करण्याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. बोरीवलीमधून दोन वेळा खासदारकी भूषवलेल्या गोपाळ शेट्टी यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आता विधानसभेलाही डावलण्यात आले आहे. भाजपने येथून विद्यमान आमदार सुनील राणे यांनाही डच्चू दिला असून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मानखुर्द शिवाजीनगरची जागा महायुतीत शिंदे गटाला सुटली असून त्यांनी सुरेश पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एबी फॉर्म घेत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने मलिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आघाडीमधील महाविकास ९० टक्के बंडखोरांना शांत करण्यात यश आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आणि कोण आपल्या भागातून लढतोय, हे ओळखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या मेंदूचा पार भुगा झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील बंडखोरांनी विद्यमान आमदारांना आणि उमेदवारांना घाम फोडला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे बंडखोर हे विद्यमान आणि पक्षीय उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. दिवाळीचे निमित्त साधून फराळाच्या निमित्ताने बंडोबांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्लान आखला जात आहे. भविष्यातील राजकारणाचा शब्द किंवा राजकीय पुनर्वसन यासारखे पर्याय देण्याची शक्यता आहे. मात्र, अनेकजण नेत्यांनाच आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्याचा फटका आजी-माजी आमदारांना बसण्याची शक्यता आहे. अडीच वर्षांत बदललेली राजकीय समीकरणे यामुळे उमेदवारी मिळवण्यात निर्माण झालेली अडचण हीच बंडखोरी होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. यात महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतही मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता आहे.

नगरसेवकपदाची निवडणूक असो वा खासदारकीची, एकदा निवडून येण्याची प्रत्येक पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार, असा विश्वास अनेक बंडखोरांना होता. मात्र विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपले नावच नसल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आणि थेट पक्षश्रेष्ठींना आव्हान देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र आता याच बंडखोरांची बंडखोरी पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ४ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरपूर्वी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे.

महामंडळ, पक्षांतर्गत बढतीचे आमीष

काही मतदारसंघात बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याने अपक्ष उमेदवारांचा पेच सोडविण्यासाठी बंडखोरांना आता विविध महामंडळे, विधान परिषदेत आमदारकी, पक्षांतर्गत बढती असे आश्वासन दिले जात आहे. परंतु बंडखोरांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना किती यश मिळते, हे ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.

या मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान

गोपाळ शेट्टी (भाजप), बोरिवली

अतुल शहा (भाजप), मुंबादेवी

दिनेश पांचाळ (भाजप), अणुशक्ती नगर

मधु चव्हाण (काँग्रेस), भायखळा

राजू पेडणेकर (ठाकरे), वर्सोवा

स्वीकृती शर्मा (शिंदे), अंधेरी पूर्व

मोहसीन हैदर (काँग्रेस),अंधेरी पश्चिम

राजू पारवे (शिंदे), उमरेड

नाना काटे (अजितदादा),चिंचवड

नवाब मलिक (अजितदादा), मानखुर्द

दिलीप माने (काँग्रेस), सोलापूर दक्षिण

logo
marathi.freepressjournal.in