Maharashtra Elections 2024 : दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करीत भरले अर्ज

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे दिग्गजांसह राज्यभरात अनेक उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज सोमवारीच दाखल केले.
Maharashtra Elections 2024 : दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करीत भरले अर्ज
Published on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार, नितेश राणे यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. दिग्गजांसह राज्यभरात अनेक उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

मु‌ख्यमंत्री शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत पाचव्यांदा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती, तर संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांना शुभाशीर्वाद दिले.

बारामतीतून अजित पवार यांचा अर्ज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. पुणे जिल्ह्यातील तहसील कार्यालयात अजित पवार यांनी अर्ज सादर केला, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ, जय पवार आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते यावेळी हजर होते. अजित पवार यांची लढत पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. युगेंद्र पवार राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार आहेत.

कणकवलीत नितेश राणे यांचा अर्ज

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी सोमवारी भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील श्री गांगो मंदिर येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातून तहसील कार्यालयाकडे येताच नितेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे दखल केला.

कुडाळमधून नीलेश राणेंचा अर्ज दाखल

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामधून सोमवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नीलेश नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

देवदर्शन घेत अमित ठाकरेंचा उमेदवारी अर्ज

माहीम विधानसभा क्षेत्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. सर्वप्रथम त्यांनी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: राज ठाकरे तिथे उपस्थित होते.

सना मलिक यांनी अर्ज भरला

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अर्ज भरला

मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सोमवारी नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी तिथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरला. या ठिकाणी त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे आव्हान आहे.

विजय वडेट्टीवार यांनी भरला अर्ज

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घरात देवाजी पूर्जाअर्चा केली. त्यानंतर त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

logo
marathi.freepressjournal.in