१ एप्रिलपासून वीजदर घटणार; २०३० पर्यंत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने दिलासा

राज्यातील महावितरणच्या सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वीज दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
१ एप्रिलपासून वीजदर घटणार; २०३० पर्यंत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने दिलासा
१ एप्रिलपासून वीजदर घटणार; २०३० पर्यंत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने दिलासा(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : राज्यातील महावितरणच्या सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वीज दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामध्ये १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना अधिक लाभ होणार असून पुढील पाच वर्षांत वीज दर तब्बल २६ टक्के कमी होणार आहे.  २०३० पर्यंत दरवर्षी वीजदर कमी होणार असल्याने राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.

महावितरणच्या २०२५ -२६ ते २०२९ -३० या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य केला आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत.

महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनुसार आयोगाने जून २०२५ मध्ये एक आदेश दिला होता. त्या आदेशाला काही व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर बोट ठेऊन जूनचा आदेश रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करून व तांत्रिक बाबी पूर्ण करून आदेश देण्याची सूचना नोव्हेंबरमध्ये केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या पुनर्विचार याचिकेवर जनसुनावणी घेऊन आज पुन्हा आदेश दिला आहे.

आयोगाने पाच वर्षांसाठी दिलेल्या आदेशानुसार, १ एप्रिल २०२६ पासून दुसरे वर्ष सुरू होत आहे. परिणामी वीज ग्राहकांना यापूर्वीच्या दरापेक्षा अधिक सवलत मिळणार आहे.

उदाहरणार्थ स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीसाठीच्या वीजवापरासाठी प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती ती आता २०२६ – २७ या आर्थिक वर्षात ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल. तर उद्योगांना व व्यावसायिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीजदरात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत मिळणार आहे. परिणामी उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत त्यांना सवलतीच्या दराने वीज मिळेल.

आयोगाने दिलेल्या आदेशात उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६ -२७ या वर्षासाठी ९ रुपये ५० पैसे प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर २०२८ -२९ पर्यंत स्थिर राहणार आहे. त्यामुळे विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. हाऊसिंग सोसायट्या आपल्या आवारात विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी लघुदाब केंद्र सुरू करू शकतात.

अशी मिळेल सवलत

  • महिना शंभर युनिटपर्यंत वीज ग्राहकांसाठीचा सरासरी दर ७ रुपये ३१ पैशावरून कमी होऊन ७ रुपये १० पैसे होईल. या ग्राहकांसाठीचा वीजदर पाच वर्षांत २६ टक्के इतका कमी होणार आहे.

  • नवा बहुवार्षिक वीजदर आदेश येण्यापूर्वी २०२५ पर्यंत हा दर ८ रुपये १४ पैसे होता.

  • शंभर ते तीनशे युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठीचा दर १३ रुपये १७ पैसे यावरून कमी होऊन १२ रुपये ९४ पैसे होईल. नवा बहुवार्षिक वीजदर आदेश येण्यापूर्वी २०२५ पर्यंत हा दर १३ रुपये २३ पैसे होता. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७८ पैसे यावरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होईल. नवा बहुवार्षिक वीजदर आदेश येण्यापूर्वी २०२५ पर्यंत हा दर १० रुपये ८८ पैसे होता. तसेच २०२९-३० या आर्थिक वर्षापर्यंत ते दरवर्षी १ एप्रिल रोजी आणखी कमी होत जातील.

logo
marathi.freepressjournal.in