
मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) निर्णय दिला आहे. त्यानुसार घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश ‘एमईआरसी’ने दिला आहे. सुधारित वीजदर १ जुलैपासून लागू करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.
महावितरणने इतिहासात प्रथमच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने आगामी पाचही वर्षात वीजदर कमी करण्याचा आदेश दिला आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन ही या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत.
महावितरणने नजिकच्या भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन ‘रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅन’ तयार केला असून त्यानुसार २०३० पर्यंत राज्याची विजेची क्षमता ८१ हजार मेगावॅट होण्यासाठी ४५ हजार मेगावॅटचे वीजखरेदी करार केले आहेत. त्यापैकी ३१ हजार मेगावॅट वीज रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार असल्याने आगामी पाच वर्षात महावितरणचे वीजखरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे महावितरणने वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडला होता.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या याचिकेनुसार प्रथमच वीजदर कपातीचा आदेश दिला आहे. वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळतानाच उद्योग, व्यवसायांना चालना मिळणार आहे. दरवर्षी औद्योगिक व व्यावसायिक वीजदरात दहा टक्के वाढ होत होती. त्याऐवजी आता पुढील पाच वर्षात या घटकांच्या वीजदरात कपात होणार आहे. ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार वीज पुरवठा करण्यास महावितरण वचनबद्ध आहे.
– लोकेश चंद्र - महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
१०१ युनिटहून अधिक वीज वापरणाऱ्यांना जास्त बिल
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार, महावितरणचे १०० युनिट वीज वापर असणाऱ्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नव्याने लागू होणाऱ्या वीज बिलामध्ये १ ते १०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ०.५८ कमी दराने वीज मिळेल. त्यामुळे या ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळणार आहे. मात्र, १०१ ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ०.३४ रुपये अधिक दराने वीज बिल येणार आहे. यामुळे या ग्राहकांना फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे ३०१ ते ५०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांनाही अधिक बिल भरावे लागणार आहे.