गेल्या वीस वर्षांत कोट्यवधी झाडे लावूनही 'महाराष्ट्र उजाड'; सरकारचे कोट्यवधी रुपये मातीत

राज्यात दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. शासकीय स्तरावरून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आखले जातात. राज्यात मोठयाप्रमाणावर जंगलतोड होत आहे. गेल्या २० वर्षात कोट्यवधी झाडे लावूनही 'महाराष्ट्र उजाड' दिसत आहे.
गेल्या वीस वर्षांत कोट्यवधी झाडे लावूनही 'महाराष्ट्र उजाड'; सरकारचे कोट्यवधी रुपये मातीत
गेल्या वीस वर्षांत कोट्यवधी झाडे लावूनही 'महाराष्ट्र उजाड'; सरकारचे कोट्यवधी रुपये मातीतप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

जळगाव : राज्यात दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. शासकीय स्तरावरून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आखले जातात. राज्यात मोठयाप्रमाणावर जंगलतोड होत आहे. गेल्या २० वर्षात कोट्यवधी झाडे लावूनही 'महाराष्ट्र उजाड' दिसत आहे.

राज्यातली जंगले ही उजाड झाली आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्राला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने केवळ पावसासाठी जंगल वाढवणे हाच पर्याय असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगत असले तरी ते गांभीर्याने घेतले जात नाही. एक उपचार म्हणून राज्य शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी विविध धोरणे आखली जातात.

२०१२ मध्ये शतकोटी वृक्ष योजना जाहीर झाली. २०१४ मध्ये शासन बदलताच पन्नास कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर झाली. त्याचा मोठा गाजावाजा केला गेला. वृक्ष लागवडीचे कोटींच्या घरात असलेले आकडे ऐकून वाचून सामान्य माणूस सुखावला. प्रत्यक्षात कोटी सोडा पण लाखात झाडे लावलेली दिसली नाहीत. केवळ वृक्ष लागवडीचे उददीष्ट पूर्ण करण्यासाठी कागदावर झाडे लागली. विविध शासकीय कार्यालयांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले गेले. शाळांना 'एक मुल एक झाड' लावायला सांगितले गेले. सर्वांचाच उत्साह मोठा होता शाळांनी आपल्या आवारात तीन हजार, दोन हजार वृक्ष लावल्याचे अहवाल पाठवत सवतःची पाठ थोपटली. मात्र शाळेचे जागाचे क्षेत्रफळ किती आणि लावलेल्या झाडांचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न कुणीही विचारला नाही.

शतकोटी वृक्ष लागवड योजनेत जळगाव जिल्हयात २०१२ ते २०१४ या तीन पावसाळयात चार कोटी ४१ लाख २६ हजार वृक्ष लावले गेले. त्यानंतर पन्नास कोटी वृक्ष लागवड योजनेत नंतर एक कोटी ९४ लाख वृक्ष लावले गेले. म्हणजेच जवळजवळ दहा वर्षात सहा कोटीहून अधिक वृक्ष लावले गेले. या अगोदरच्या दशकात साडेसात कोटी वृक्ष लावले गेले होते.

गेल्या २० वर्षात १५ कोटी वृक्ष लावले. जवळजवळ दोनशे कोटींचा चुराडा झाला. तरीही आज जळगाव जिल्हा हा उजाड दिसत आहे. लावलेली ही कोटयावधी झाडे कोठे गेली हे कुणीही विचारण्याची हिंमत करत नाही. जळगावचे उन्हाळयात तापमान ४६ अंशावर जाते. वृक्षलागवडीची कोटयावधींची आकडेवारी पाहिल्यावर वृक्ष कागदोपत्री लावले गेले नाहीत ना अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागते. जळगाव शहरात माजी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांचे हस्ते मेहरूण तलाव परिसरात शंभर वडाची झाडे लावली गेली. आज एकही वडाचे झाड तेथे नाही. जळगाव शहरात काँक्रीटचे रस्ते केले जात आहेत. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमान अधिक जाणवत आहेत. गारव्यासाठी नागरिक झाडे शोधत आहेत. त्यामुळे प्रश्न विचारला जातो की ही लावलेली झाडे गेली कुठे, कोटयावधी झाडे लावून जिल्हा महाराष्ट्र उजाड कसा? गेल्या काही वर्षात कोट्यवधी झाडे लावली तरी जिल्हा राज्य उजाड झाले असले तरी आमच्या लोकप्रतिनिधींना ते दिसत नाही, हे आमचे दुर्दैव.

वाघ कॉरिडॉरसाठी उदासीनता

सातपुडा हा वनराजी आणि वन्यप्राण्यांनी समृध्द होता. त्यात अनेक वनौषधी वृक्ष होते. वनविभागाने अनेक वर्ष सातत्याने नाकारले असले तरी दाट जंगलामुळे सातपुड्यात वाघांचा अधिवास होता. आज जिल्हयात सहा ते आठ वाघ आहेत. वाघाच्या कॉरीडॉरसाठी वन्यप्राणी संघटना अनेक वर्ष लढा देत असल्या तरी उदासीन वनविभागाचे कागदपत्र हलत नाही. शासनाने दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट कागदोपत्री पूर्ण करण्याचे काम केले जाते.

logo
marathi.freepressjournal.in